कुरुंदवाड : २८ लाभार्थ्यांना 'रमाई घरकूल'साठी धनादेश वितरित | पुढारी

कुरुंदवाड : २८ लाभार्थ्यांना 'रमाई घरकूल'साठी धनादेश वितरित

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : कुरुंदवाड शहरातील ४१ लाभार्थी पैकी पहिला टप्पा म्हणून रमाई आवास घरकूल योजनेअंतर्गत २८ लाभार्थ्यांना  सव्वा लाख रुपयाप्रमाणे ३५ लाखांचे धनादेश वितरित करण्यात आले. प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी ऐन दसऱ्याच्या तोंडावर नागरिकांना घरकूलची गोड भेट देत धनादेश वितरित केल्याने लाभार्थ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान प्रशासक तथा मुख्याधिकारी जाधव व पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही सर्व प्रस्तावांची पडताळणी करून प्रस्ताव पात्र ठरवले. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थींच्या खात्यावर लाखो रुपयांचे धनादेश वितरित केल्याने काही लाभार्थ्यांना अश्रू अनावर झाले.

येथील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी सायंकाळी पाच वाजता रमाई घरकूल आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यातील धनादेश वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी २८ लाभार्थ्यांना धनादेश वितरण करण्यात आले.

अनुसूचित जाती तथा नवबौद्ध समाजासाठी असणाऱ्या रमाई आवास घरकूल योजनेसाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी जाधव यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले होते. यासाठी शहरातून ४८ प्रस्ताव प्राप्त झाले होते. आर्थिक निकष आधारावर आणि कागदपत्रकांची पडताळणी केली असता ४१ प्रस्ताव पात्र ठरले तर ७ प्रस्ताव कागदपत्रकाआभावी प्रलंबित राहिले आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थीला अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे. पहिला टप्पा सव्वा लाख, दुसरा टप्पा एक लाख व तिसरा टप्पा पंचवीस हजार रुपये अशा पद्धतीने रक्कम वितरित करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यातील प्रकाश आवळे, सम्राट कडाळे, संजय कमलाकर,नंदकिशोर सातपुते, सुधा कांबळे, सीमा कांबळे, दीपक आवळे, मल्लू मोरे, दीपक कांबळे, रामचंद्र भंडारे, शोभा कांबळे, सुभाष आवळे, बाळकृष्ण शेट्टी, राहुल जाधव, पांडुरंग भंडारे, शांता आवळे, उत्तम कांबळे, प्रमोद कडाळे, राजेश मधाळे, यासह लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख पंचवीस हजार प्रमाणे ३५ लाखाचे धनादेश वितरित करण्यात आले.

यावेळी कार्यालय निरीक्षक पूजा पाटील, माजी नगराध्यक्ष अक्षय आलासे, माजी उपनगराध्यक्ष जवाहर पाटील, प्रफुल्ल पाटील, सुचितोष कडाळे, नंदकुमार चौधरी,योगेश गुरव प्रदीप बोरगे आदी उपस्थित होते.

हे वाचलंत का?

Back to top button