कुरुंदवाड : घोसरवाड येथील नाईकवाडे कुटुंबियांनी विधवा प्रथेला दिली मूठमाती | पुढारी

कुरुंदवाड : घोसरवाड येथील नाईकवाडे कुटुंबियांनी विधवा प्रथेला दिली मूठमाती

कुरुंदवाड ; पुढारी वृत्तसेवा : हेरवाड ता.शिरोळ ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करुन क्रांतिकारी मशाल पेटविली आणि याची अंमलबजावणी केली. आता हेरवाड पाठोपाठ घोसरवाड येथील नाईकवाडे कुटुंबियांनी विधवा प्रथेला मूठमाती देऊन एक निर्णायक पाऊल उचलले असून या प्रथा बंदीच्या निर्णयाचे घोसरवाडकरांनी ही स्वागत करून सुरवात केली आहे.

घोसरवाड ता.शिरोळ येथील धनगर समाजातील सिद्राम नाईकवाडे (वय 32) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २२ वर्षाची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले आहेत. याची माहिती हेरवाडचे सरपंच सुरगोंडा पाटील यांना मिळताच त्यांनी गावातील पदाधिकार्‍यांसोबत नाईकवाडे यांच्या घरी जावून विधवा प्रथा बंदबाबत जागृती केली महिलांनाही सर्वांच्याबरोबर सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, त्यांचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे असा प्रकार अशोभनीय आहे. त्यामुळे नाईकवाडे कुटूंबियांनी ही प्रथा बंद करुन या निर्णयात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. आणि याला नाईकवाडे परिवाराने होकार दर्शविला.

हेरवाड पाठोपाठ घोसरवाड गावांनेही या प्रथेला मूठमाती देऊन क्रांतिकारी मशाल पेटवली आहे, त्यामुळे नाईकवाडे कुटुंबीयांचे या निर्णयाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी घोसरवाडचे उपसरपंच मयुर खोत, तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी पाटील, ग्रामविकास अधिकारी रेळेकर, अंजना डवरी, संजय पुजारी, गोटू तेरवाडे, रोहित कांबळे, अमित शिरोळे, अमोल देबाजे, आण्णाप्पा कुंभार यांच्यासह नाईकवाडे कुटूंबिय उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button