कोल्‍हापूर : किणीतल्‍या मंडळाने साकारली आदर्श गावाची प्रतिकृती; गणेशोत्‍सवानंतरही अधिकाऱ्यांच्या भेटी | पुढारी

कोल्‍हापूर : किणीतल्‍या मंडळाने साकारली आदर्श गावाची प्रतिकृती; गणेशोत्‍सवानंतरही अधिकाऱ्यांच्या भेटी

किणी; पुढारी वृत्तसेवा : येथील शिवराज कला व क्रीडा मंडळाने गणेशोत्सवादरम्यान आदर्श गावाच्या रोल मॉडेलची प्रतिकृती साकारली होती. आदर्श गाव कसे असावे याचे रोल मॉडेल असणाऱ्या किणी गावाची प्रतिकृती पहाण्यासाठी नागरिकांनी गणेशोत्‍सव काळात गर्दी केली होती. गणेशोत्‍सवानंतरही सर्वसामान्यांसोबतच शासकीय अधिकारीही या देखाव्यास भेटी देत आहेत.

गणेशोत्सवात दरवर्षी आपले वेगळेपण जपत समाजाला प्रगतीचा संदेश देणाऱ्या शिवराज कला व क्रीडा मंडळाने यावर्षी किणी गावच्या नकाशाप्रमाणे बिनचूक प्रतिकृती उभारली आहे. त्यामध्ये रस्ते, देवालये, जैन मंदिरे, मशिद, गावचा पाणी पुरवठा योजना, शाळा तसेच सध्या गावात सुरू असणाऱ्या योजना व अपेक्षित योजनांचा समावेश करत आदर्श गाव कसे असावे याचे रोल मॉडेल तयार केले आहे.

गावात मंजूर असणारे ग्रामीण रुग्णालय, देवराई प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन, सोलर ग्राम, तलाव संवर्धन, लहान मुले व ज्येष्ठ  नागरिकांसाठी विरंगुळा पार्क, सुरक्षा कवच (सीसीटीव्ही), ज्यांना घरे नाहीत त्यांच्यासाठी घरकुल संकुल, क्रीडांगण, व्यायाम शाळा व अभ्यासिका यांचा या मॉडेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. देखावा खुला केल्यापासून अनेक गावातल्‍या नागरिक व कार्यकर्त्यांनी या रोल मॉडेलला भेट देऊन अभ्यास करण्याबरोबरच मंडळाचे कौतुक केले आहे. हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, सभापती डॉ. प्रदीप पाटील यांनीही भेट देऊन या रोल मॉडेलचे कौतुक करत आणखी काही दिवस हा देखावा पाहण्यासाठी खुला ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा :  

Back to top button