पंतप्रधानांचे पिंपळगाव जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना आभाराचे पत्र | पुढारी

पंतप्रधानांचे पिंपळगाव जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना आभाराचे पत्र

मंचर; पुढारी वृत्तसेवा:  महाळुंगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभाराचे पत्र पाठवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र प्राप्त झाल्याने शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी आनंद व्यक्त केला आहे. या शाळेतील शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांनी यावर्षी इयत्ता तिसरीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांकडून टाकाऊपासून टिकाऊ या उपक्रमांतर्गत बीज राख्या तयार करून घेतल्या होत्या.

विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या राख्या व पत्रलेखन उपक्रमांतर्गत स्वतः लिहिलेली पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय सैनिकांना पाठवल्या होत्या. बीज राखीच्या बिया एका भांड्यात लावा आणि त्याची रोपे तयार करून निसर्गात लावा, असा संदेश विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पत्रांमधून देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या बीज राख्या व पत्रांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकार केला आणि त्यांनी शाळेच्या पत्त्यावर गांजाळे यांच्या नावाने विद्यार्थ्यांसाठी आभाराचे पत्र पाठवून उत्तर दिले आहे.

पंतप्रधानांचे पत्र प्राप्त झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कार्यकारिणी, ग्रामस्थ व पालकांनी या प्रकल्पाचे कौतुक केले आहे. मृणाल गांजाळे यांनी राबविलेल्या उपक्रमाची दखल पंतप्रधानांनी घेतली, ही आमच्या शाळेसाठी गौरवाची बाब असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले आहे.

Back to top button