कोल्हापूर : पाटगांव मौनी सागर जलाशय १००% भरले | पुढारी

कोल्हापूर : पाटगांव मौनी सागर जलाशय १००% भरले

कडगांव; पुढारी वृत्तसेवा : भुदरगड तालुक्याच्या (कोल्हापूर)  पश्चिम भागात गेले चार दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाटगांव येथील मौनी सागर जलाशय पुर्ण क्षमतेने भरल्याने धरणामध्ये शंभर टक्के पाणी साठा झाला आहे. सध्या धरणाच्या सांडव्यातून कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू झाला असून पावसाचा जोर वाढल्यास रविवारी (दि.11) सकाळपर्यंत धरणाच्या पाण्यातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने नदीकाठाच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आता पाटगाव मध्यम प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरल्याने भुदरगड तालुक्यासह, कागल, कर्नाटक राज्यातील काही गावांचा वर्षभराचा पिण्याचा व शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

गतवर्षी पाटगाव धरण ११ सप्टेंबरला भरले होते. पण यावर्षी देखील याच तारखेला भरले आहे. यावर्षी जुलैला पाटगाव परिसरात रेकॉर्डब्रेक पाऊस झालेला होता. त्यावेळी धरणांमध्ये 84 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर पाटगाव परिसरात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु होता. त्यामुळे पाटबंधारे विभागाने पुराचा धोका उद्भऊ नये म्हणून धरणातुन अगोदरच विसर्ग चालु ठेवल्याने धरण भरण्यास विलंब झाला. पण गेले दोन दिवस धरण परिसरात संततधार पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होऊन धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणात सुमारे ३.७५ टि. एम.सी. पाणीसाठा झाला आहे जून पासुन धरण परिसरात आज अखेर सुमारे ५२५० मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी 626.60 मी. इतकी  झाली आहे.

आजचा एकूण पाणीसाठा 105 द.ल.घ. आहे गतवर्षाच्या तुलनेत सुमारे २०० मि.मि. कमी पावसाची नोंद झाली असून गेल्या चोवीस तासात पाटगांव परिसरात 50 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील कोंडूशी, नागणवाडी आणि फये लघुप्रकल्प अगोदरच भरले आहेत. सततच्या पावसाने वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत काहीशी वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे नदी काठच्या उस पिकासह भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीवर भुदरगडच्या तहसिलदार आश्विनी वरुटे, पाटबंधारे अधिकारी महेश चव्हाण , शाखा अभियंता मनोज देसाई हे लक्ष ठेवुन आहेत.

पाटगाव धरण भरल्यानंतर, सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू झाल्यास, धरणातील साखळीने खेळत खेळत आलेले मासे सांडव्यातून मोठ्या प्रमाणात खाली पडतात मग हे मासे पकडण्यासाठी परिसरातील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने गर्दी करतात.

हेही  वाचा

Back to top button