Ganeshotsav 2022 : इचलकरंजीत ‘पोलिसांचा जीवनपट’ देखावा; ‘वर्दीतला’ उभा म्हणून ‘गर्दीला’ शोभा | पुढारी

Ganeshotsav 2022 : इचलकरंजीत ‘पोलिसांचा जीवनपट’ देखावा; ‘वर्दीतला’ उभा म्हणून ‘गर्दीला’ शोभा

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : गणपती आगमनापूर्वीच इचलकरंजीत विसर्जनावरुन प्रशासन आणि गणेश मंडळातील वाद धुमसत होता. अशातच थोरात चौक येथील न्यू गणेश मंडळाने स्लोगन आणि चित्ररुपी पोस्टरच्या माध्यमातून पोलिसांचे धगधगते अंतरंग समाजासमोर आणले आहे. वस्त्रनगरीत सध्या हा एकच चर्चेचा विषय ठरला आहे. (Ganeshotsav 2022)

‘माणूस उभा आहे वर्दीतला, म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला’, ‘नऊ दिवस नऊ रंग, खाकी मात्र बंदोबस्तात दंग’ अशा  स्लोगन लक्षवेधून घेत आहेत. इचलकरंजीचा संवेदनशील शहराच्या यादीत समावेश असल्याने दसरा, दिवाळी, ईद, रमजान, गणेशोत्सव आदी सणांमध्ये पोलिसांची कसोटी लागते. कायदा सुव्यवस्था बिघडू नये समाजातील शांतता कायम राखण्यासाठी पोलीस डोळ्यात तेल घालून काम करीत असतात. मात्र त्यांची ही सेवा समाजाकडून नेहमीच दुर्लक्षित राहत आली आहे. (Ganeshotsav 2022)

संचारबंदी असो की खून, मारामारी, जातीय दंगल अशा वेळी पहिल्यांदा पोलीसच लक्ष्य ठरतात. अशा घटनांवेळी समाजाकडून होणारे आरोप, टिकेकडे दुर्लक्ष करुन सामाजिक शांतात आणि सलोखा राखण्यासाठी पोलिसांची धडपड असते. यावेळी कुटुंबाकडेही वेळ देता येत नाही. नेमून दिलेले काम आणि कामाचे ठिकाणच आपले कुटुंब समजून पोलीस सेवा बजावत असतात. अशा परिस्थिती टिका करणार्‍या समाजाला पोलिसांची सेवा दिसत नाही, तोही खाकी वर्दीतील एक माणूसच आहे हे समाज विसरतो. मात्र यंदाच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून थोरात चौकातील न्यू गणेश मंडळाने पोलिसांचा जीवनपट चित्ररुपातून समाजासमोर मांडण्यााचा प्रयत्न केला आहे. ही कल्पकता पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी एकच गर्दी उसळली आहे.

पोलीस अधिकार्‍यांकडून देखाव्याला भेट

ही संकल्पना पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांनाही चांगलीच भावली आहे. ते स्वत:हून कुटुंबासह भेट देवून कौतुक करत आहेत. अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपाधिक्षक बाबुराव महामुनी, पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, महादेव वाघमोडे, सपोनि विकास अडसुळ, अभिजीत पाटील आदींनी भेटी देवून अभिप्राय नोंदवले आहेत.

पोलीस हा कुणाचा शत्रू नाही. तो आहे म्हणून समाजात शांतता आहे. त्यासाठी त्याला अनेक कठीण प्रसंगात काम करावे लागते. त्याही ही प्रतिमाही समाजासमोर आली पाहिजे. या भावनेतून चित्ररुपी पोलीस मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
– संतोष मांगले, मंडळाचे संकल्पक

हेही वाचा

Back to top button