जयसिंगपूर पोलिसांनी लेझीम खेळत केले बाप्पांचे विसर्जन | पुढारी

जयसिंगपूर पोलिसांनी लेझीम खेळत केले बाप्पांचे विसर्जन

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या सात दिवसांपासून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांनी रात्रदिवस बंदोबस्त देण्याचे काम केले. या कामाच्या धकाधुकीतून मंगळवारी जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी आठ दिवसांचा थकवा दूर करीत पोलिसांनी लेझीम खेळ खेळला. हालगीचा कडकडात, सनईच्या मधूर स्वरात आणि धनगरी ढोल, अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यात आला.

शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर पोलीस ठाण्यांतर्गत ११ गावांचा समावेश आहे. यात जयसिंगपूर, उदगाव, दानोळी यासह मोठी गावे येतात. या ११ गावात ३०० पेक्षा अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात श्रींची प्रतिष्ठापना केली होती. त्यामुळे जयसिंगपूर पोलिस गेल्या आठ दिवसापासून परिसरातील बंदोबस्तात व्यस्त होते. रात्रदिवस सेवा बजावत असताना पोलिसांना सणांचा आनंद घेता येत नाही.
दरम्यान, आज पोलीस ठाण्यातील गणरायाचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्यासह कर्मचार्‍यांनी हातात लेझीम धरीत ठेका धरला. हालगी, सनईच्या निनादात गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button