शिवसेना-शिंदेसेनेमध्ये ‘माना’चा तंटा! निर्णयाचा चेंडू पोलिसांच्या कोर्टात; मुंबईनंतर नगरमध्ये शिंदेसेना आक्रमक | पुढारी

शिवसेना-शिंदेसेनेमध्ये ‘माना’चा तंटा! निर्णयाचा चेंडू पोलिसांच्या कोर्टात; मुंबईनंतर नगरमध्ये शिंदेसेना आक्रमक

नगर, पुढारी वृत्तसेवा: खरी शिवसेना कोणाची? हा लढा न्यायालयात सुरू असताना नगरमध्ये शिंदे गटाने परंपरागत सेनेच्या मानाच्या मिरवणुकीवर दावा ठोकला आहे. शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांसह शहरप्रमुखांनी कोतवाली पोलिसांत मानाच्या मिरवणुकीवर दावा ठोकला असून, मिरवणुकीच्या परवानगीसाठी तसे रितसर पत्र सोमवारी (दि.5) कोतवाली पोलिसांना दिले आहे. गणपतीच्या मिरवणुकीवर शिंदे गटाने दावा केल्याने शिवसेना गट काय भूमिका घेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाळीनंतर सेनेत शिंदेसेना व शिवसेना असे दोन गट पडले आहेत. तसेच, आपणच खरी शिवसेना असल्याचे म्हणत शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे गट आणि सेना गट यांच्यातील संघर्ष हा न्यायालयाच्या निर्णयानंतरच मार्गी लागेल, असे चित्र सध्या तयार झाले आहे.

दरम्यान, जिल्हा पातळीवर देखील हाच वाद वेळोवेळी उद्भवत असल्याचे दिसत असून, शिंदे गटाकडून खरी शिवसेना तेच असल्याचे सांगितले जात आहे. नगरमध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मानाच्या मिरवणुकीत 14 क्रमांकाच्या मिरवणुकीचा मान शिंदे गटाला मिळावा, यासाठी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांनी कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना सोमवारी पत्र दिले आहे. अनिल शिंदे यांच्यासह शहरप्रमुख दिलीप सातपुते, सचिन जाधव यांनी मिरवणूक परवानगीसाठी कोतवाली पोलिस ठाण्यात आले होते. मात्र, 14 हा क्रमांक शिवसेनाप्रणित नेता सुभाष तरूण मंडळाला तत्कालीन आमदार अनिल राठोड यांच्या कार्यकाळापासून म्हणजेच सुमारे 35 वर्षांपासून दिला जात आहे.

राठोड यांच्या निधनानंतर नगरमध्ये प्रथमच शिवसेनेंतर्गत विसर्जन मिरवणुकीच्या मानावरून वाद उद्भवला आहे. मुंबईनंतर शिंदेसेना नगरमध्ये चांगलीच आक्रमक झाली असून, त्यामुळे पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला आहे. पोलिस प्रशासन आता काय भूमिका घेणार, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षी अशी होती मंडळे

1) विशाल गणपती – माळीवाडा, 2) संगम तरूण मंडळ – वसंत टॉकीज, 3) माळीवाडा तरूण मंडळ – माळीवाडा वेस, 4) आदिनाथ तरूण मंडळ – फुलसौंदर चौक, 5) दोस्ती तरूण मंडळ – शेरकर गल्ली, 6) नवजवान तरूण मंडळ – फुलसौंदर चौक, 7) महालक्ष्मी तरूण मंडळ – माळीवाडा, 8) कपिलेश्वर तरूण मंडळ – माळीवाडा, 9) नवरत्न तरूण मंडळ – कवडे गल्ली, 10) समजोता तरूण मंडळ – कानडे गल्ली, 11)निलकमल तरूण मंडळ – ब्रम्हण गल्ली, 12) शिवशंकर तरूण मंडळ – पंचपीर चावडी, 13) आनंद तरूण मंडळ – आझाद चौक, 14) शिवसेना – शिवसेना शहर, 15) दोस्ती मित्र मंडळ (बारातोटी कारंजा)

आम्हीच खरी शिवसेना : सातपुते

शिवसेनेतील गटाचे माहित नाही, पण आम्हीच खरी शिवसेना असल्याने परंपरागत शिवसेनेला मानाच्या मिरवणुकीत परवानगी मिळावी, यासाठी शिवसेना शहरप्रमुख म्हणून पोलिसांना पत्र दिले आहे. पोलिस प्रशासनाकडून आम्हाला शिवसेना म्हणून परवानगी मिळणार असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.

वरिष्ठ पातळीवरून निर्णय होणार?

आतापर्यंत शिवसेनेला मिरवणुकीत परवानगी मिळावी, यासाठी दिलीप सातपुते हे अर्ज करत होते. मात्र, आता तेच शिंदे गटात असल्याने यंदा त्यांनी शिवसेना म्हणून अर्ज केला आहे. त्यामुळे मानाच्या मिरवणुकीत 14 क्रमांक कोणाला द्यायचा, असा पेच पोलिस प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवरून निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे.

गणपती विसर्जन मिरवणुकीत शिवसेना म्हणून परवागनीसाठी अनिल शिंदे, दिलीप सातपुते यांनी अर्ज दिला आहे. यावर वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय होईल.
-संपत शिंदे, पोलिस निरीक्षक, कोतवाली

Back to top button