काेल्‍हापूर : हालेवाडीत वस्तीत लक्ष्मी मंदिरातील पावणेसहा लाखांचे दागिने लंपास | पुढारी

काेल्‍हापूर : हालेवाडीत वस्तीत लक्ष्मी मंदिरातील पावणेसहा लाखांचे दागिने लंपास

आजरा (कोल्‍हापूर) : पुढारी वृत्तसेवा : हालेवाडी (ता.आजरा) येथे वस्तीत असणाऱ्या लक्ष्मी मंदिराचे दरवाजाचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्यांनी मूर्तीवरील पाच लाख 72 हजार रुपयाचे सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या घटनेमूळे उत्तूर पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शुक्रवार दिनांक १९ रोजी रात्री ते शनिवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी भरवस्तीत असणाऱ्या लक्ष्मी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मूर्तीवरील सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिन्‍यांची चोरी केली. शनिवारी सकाळी सुनील शिवाजी पाटील (रा.हालेवाडी) हे मंदिराची स्वच्छता व मूर्तीची पूजा करण्यासाठी आले.  तेव्‍हा चाेरीचा प्रकार उघड झाला. घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिराच्या आवारात मोठी गर्दी केली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारगुडे व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. पथक अर्दाळच्या दिशेने मार्गस्थ झाले.

चोरीच्या घटनेनंतर गडहिंग्लज उपविभागीय प्रमुख पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. चोरीची फिर्याद देखभाल करणारे सुनील पाटील यांनी उत्तर दूरक्षेत्र येथे नोंद केली आहे.

मंदिरातील सीसीटीव्ही लंपास

मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा कार्यान्वित होती. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी सीसीटीव्हीची संपूर्ण यंत्रणाच घेऊन पोबारा केल्याने तपासणीवर मर्यादा येत आहेत. यावरून चोरटे माहितीगार असण्याची शक्यता पोलिसांनी व्‍यक्‍त केली आहे.

हेही वाचा

Back to top button