‌राधानगरी धरण ९२ टक्के भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा | पुढारी

‌राधानगरी धरण ९२ टक्के भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

‌‌राधानगरी; पुढारी वृत्तसेवा : ‌राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धरण ९२ टक्के भरले आहे. धरणाची पाणी पातळी स्थिर असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अवघे चार फूट पाणी कमी आहे. पावसाचा जोर कायम असून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. रात्री उशिरा किंवा उद्या दुपारपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असून कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.

आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात धरण क्षेत्रात १५० मिमी, तर सोमवारी दहा तासात १०२ मिमी पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर २६६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणातून खासगी वीजनिर्मितीसाठी १६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे.

धरणात ७६४१.७६ द.ल.घ.फु. इतका पाणीसाठा असून पाणी पातळी ३४३.३८ फूट इतकी झाली आहे. ३४७.५० फूट पाणी पातळीला धरण पूर्ण क्षमतेने भरते. जोमदार व दमदार पडणाऱ्या पावसामुळे महापूर सदृश्य स्थिती झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे भोगावती नदीपात्रात झपाट्याने वाढ झाली आहे.

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची अवाक होत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे खुले होण्याची शक्यता असून नदीपात्रात वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.

– प्रवीण पारकर, उपअभियंता (पाटबंधारे विभाग)

हेही वाचलंत का ? 

Back to top button