कोल्हापूर : मुस्लिम समाज नसलेल्या मजरेवाडीत हिंदू बांधवांनी केली पिराची प्रतिष्ठापना | पुढारी

कोल्हापूर : मुस्लिम समाज नसलेल्या मजरेवाडीत हिंदू बांधवांनी केली पिराची प्रतिष्ठापना

कुरुंदवाड (कोल्हापूर) : जमीर पठाण : पुरोगामी विचाराच्या शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथे जैन-लिंगायत-मराठा-धनगर समाज बांधवांनी एकही मुस्लिम समाजाचे कुटुंब नसताना गावात पिराची प्राणप्रतिष्ठापना केली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत स्वखर्चातून आणि लोकवर्गणीतून लाखो रुपये खर्चून प्रतिष्ठापनेसाठी दर्ग्याचे बांधकाम पूर्ण केले.

हिंदू समाज बांधव पिराची प्रतिष्ठापना करून मजरेवाडी ग्रामस्थ मनोभावे पिराची सेवा करतात. खतम विधीसाठी मानधनावर कुरुंदवाड येथील बापू मुल्ला यांना बोलावून दहा दिवस त्यांना मानपान करून धार्मिक विधी पार पाडत असतात. हा एकतेचा संदेश आहे.

मजरेवाडी हे गाव ३ हजार लोकवस्तीचे आहे. येथे नृसिंहवाडी येथील दत्त महाराजांच्या पुजेसाठी लागणाऱ्या फुलांची बाग तर जैन धर्मियांचे धर्मगुरू श्री. पिहिताश्र्व महाराजांची समाधी आहे. धार्मिकतेचा गंध असणारे हे गाव आहे. गावात हनुमान मंदिरासमोर पीर-पंजाची प्रतिष्ठापणा करून मोहरम सण केला जातो. गावकऱ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी दर्गा बांधला. तर दर्गाचे काम अपूर्ण होते म्हणून काही गावकऱ्यांनी आपल्या शेतीवर कर्ज काढून बांधकाम पूर्ण केले. याठिकाणी मुस्लिम समाज वगळता समस्त हिंदू-समाज बांधवा मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी नेहमीप्रमाणे कुदळ विधी पार पाडून बुधवारी पिराची प्रतिष्ठापना केली आहे. सातव्या दिवशी पिराची भेट आहे.

समस्त गावकरी पेढे, खोबरे, काजू, बदाम, खारीकची उधळण करून घरोघरी पाणी घालतात. नवव्या दिवशी खाई उधळणीचाही कार्यक्रम आहे. समस्त गावाला जारत निमित्त महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

हिंदू बांधवांनी गावात पिराची प्रतिष्ठापना करून धार्मिक एकात्मतेचा संदेश दिला आहे. ही परंपरा मजरेवाडीकरांनी जोपासली आहे.

Back to top button