कोल्हापूर: पार्किंगच्या वादातून मंगळवार पेठेत 11 मोटारींची तोडफोड | पुढारी

कोल्हापूर: पार्किंगच्या वादातून मंगळवार पेठेत 11 मोटारींची तोडफोड

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : मंगळवार पेठ, पद्मावती मंदिर परिसरात एका युवकाने शुक्रवारी मध्यरात्री दहशत माजवीत रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या 11 आलिशान मोटारींची तोडफोड केली. मोटारींची तोडफोड या प्रकाराने त्या परिसरात दिवसभर प्रचंड तणाव होता. राजवाडा पोलिसांनी स्वप्निल बाळकृष्ण तावडे (वय 30, रा. माळी गल्‍ली, मंगळवार पेठ) त्याच्या घरातून लोखंडी रॉड जप्‍त करण्यात आला. यामध्ये मोटारींचे साडेसहा लाखांचे नुकसान झाले आहे. या मोटारींच्या दर्शनी भागासह चारही बाजूच्या काचा फोडून वाहनांमधील कारटेप, स्टेपनी टायर ट्यूबसह महागड्या वस्तूही लंपास करण्यात आल्याचे उघडकीला आले. यामुळे वाहनधारक प्रक्षुब्ध झाले होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहायक निरीक्षक संदीप जाधव यांनी पाहणी केली. तेथे पोलिसांचा फौजफाटा पाचारण करण्यात आला, संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवळला.

वाहनधारक प्रक्षुब्ध

शुक्रवारी रात्री उशिरा अथर्व शुक्ल, सोहम जोशी, शुभम विभुते, महेश वालावलकर, महेंद्र जोशी, निखिल मोरे, महेश पाटील, दशरथ पाटील, प्रभाकर म्हेतर, शशिकांत दिवाण, मयुरेश पाटील यांच्या मोटारींच्या काचा रॉडने फोडल्या.

चोरीचाही गुन्हा दाखल

सिद्धिविनायक किरण गवळी (रा. मंगळवार पेठ) यांनी संशयिताविरुद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्यावर चोरीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयिताकडून मातेसह बहिणीला मारहाण

त्र्यंबोली यात्रेनिमित्त या परिसरात शुक्रवारी सायंकाळी मिरवणुकीत संशयिताचा काही तरुणांशी वादही झाला होता. रात्री उशिरा किरकोळ कारणातून त्याने आई व बहिणीला मारहाण केली. स्वप्निलविरुद्ध आई, बहिणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे सांगून पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी याच घटनेनंतर त्यानेे वाहनांची तोडफोड केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध करीत आहोत, असे स्पष्ट केले.

पार्किंगला विरोध; वादावादी

पद्मावती मंदिर परिसरातील रस्त्यालगत मोटारी पार्किंगच्या कारणावरून संशयित व परिसरातील वाहनधारक यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू आहे. मोटारी पार्किंग करण्यास संशयिताने विरोध केल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली होती. यापूर्वीही मोटारीच्या काचा फोडण्याच्या घटना घडल्या होत्या. संबंधित तरुणाला समज देण्याचा प्रयत्न मोटारमालकांनी केला होता.

हेही वाचा

Back to top button