बंजारा समाजाची हस्तकला, विणकाम कला टिकली पाहिजे : डॉ. सदानंद मोरे | पुढारी

बंजारा समाजाची हस्तकला, विणकाम कला टिकली पाहिजे : डॉ. सदानंद मोरे

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा बंजारा समाजाची पारंपरिक वेशभूषा आहे. ती हस्तकला, विणकाम टिकली पाहिजे, अशी आशा संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली. ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत ग्रामीण पोलिस मुख्यालयात तीन दिवस हस्तकला, विणकाम, पेंटिंग अशा विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. या प्रदर्शनाच्या शुभारंभ प्रसंगी मोरे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून भटके विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी प्रस्तावना केली. महिलांना काम मिळावे, पुनर्वसन व्हावे, सन्मान मिळावा यासाठी विणकाम, शिलाईकाम उपक्रम केले. आणखी 1000 ते 1200 जण यात जोडले जातील, असे सांगितले. ग्रामीण पोलिसांनी हातभट्टी व्यवसायातून लोकांना बाहेर काढले. महिलांना शिवणकाम व विणकाम क्षेत्राकडे वळवून विणकाम साहित्य उत्पादन घेतले याचे सदानंद मोरे यांनी कैतुक केले. पोलिसांनी कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच पुनर्वसन, समुपदेशन आणि हाताला काम दिले, हे मोठे परिवर्तन असल्याचेे बाळकृष्ण रेणके यांनी सांगितलेे. जिल्ह्यातील हातभट्टी व्यवसायात परिवर्तन आणले. याच धर्तीवर सोलापूर शहरात शिंदीखान्यांतही परिवर्तन करणे गरजेचे असल्याचे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी मांडले.

ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत शासन दरबारी मदत करण्यासाठी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले. याशिवाय जिल्हाधिकारी शंभरकर, पोलिस आयुक्त माने, सीईओ स्वामी यांची भाषणे झाली. अपर अधीक्षक हिंमत जाधव यांनी आभार मानले. प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय श्वेता हुल्ले यांनी करून दिला. या कार्यक्रमास सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, विविध तांड्यांवरील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दहा स्टॉलच्या माध्यमातून दोन दिवस विक्री व प्रदर्शन
सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात (अलंकार हॉल) प्रदर्शन व विक्री 22 ते 24 जुलै या कालावधीत सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत चालणार आहे. विविध हस्तकला, शिवणकाम, पेंटिंग या प्रदर्शनात आहेत. हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुलेे आहे.

Back to top button