कोल्हापूर : यळगूड येथील बेपत्ता बालिकेला सावत्र पित्यानेच पंचगंगेत फेकले

प्रणाली साळुंखे
प्रणाली साळुंखे
Published on
Updated on

कोल्हापूर जिल्ह्यातील यळगूड (ता. हातकणंगले) येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय बालिकेला सावत्र पित्यानेच इचलकरंजीतील पंचगंगा नदीत फेकल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ८) उघडकीस आली. मुलगी हरवल्याची तक्रार देणार्‍या बापास पोलिसी खाक्या दाखवताच कृत्याची कबुली दिली.

कु. प्रणाली युवराज साळुंखे (वय 9, रा. श्रीराम मंदिर समोर, यळगूड) असे बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवराज आत्मारास साळुंखे (वय 39) याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मुलीचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

युवराज साळुंखे हा चांदी कारागीर आहे. त्याचा यापूर्वी दोन वेळा विवाह झाला आहे. मात्र अपत्य होत नसल्यामुळे त्याने दोन्ही पत्नींना सोडचिठ्ठी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील एका विवाहित महिलेशी तिसरा विवाह केला. संबंधित महिलेला पहिल्या पतीपासून प्रणाली ही मुलगी होती. प्रणालीला सांभाळण्याच्या अटीवर हा विवाह झाला होता. मात्र काही महिन्यांपासून युवराज वारंवार प्रणाली हिच्याबरोबर फटकून वागत होता. या कारणातून कुटुंबात वाद होत होते. त्यातच युवराजची पत्नी पुन्हा गर्भवती आहे. त्यामुळे सावत्र मुलगी प्रणाली हिच्याविषयी युवराज आणखीनच चिडून असायचा.

22 ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घरातूनच प्रणाली बेपत्ता झाली. याबाबतची वर्दी युवराजने हुपरी पोलिस ठाण्यात दिली. दोन दिवसांपासून प्रणालीचा शोध सुरू होता. सोमवारी काही नातेवाईकांनी अधिक गतीने शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र युवराज त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे नातेवाईकांना त्याचा संशय आला. त्यातच पोलिसांनाही कुणकुण लागली. त्यामुळे पोलिसांनी तक्रार देणार्‍या युवराजलाच पोलिसी खाक्या दाखवताच बनाव उघडकीस आला व त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली.

सावत्र पित्याच्या कबुलीनंतर पोलिसांनी तातडीने यंत्रणा कार्यरत केली. शिवाजीनगरचे स.पो.नि. प्रमोद मगर यांच्यासह पथकाने पंचगंगा नदी घाटावर धाव घेतली. हुपरी पोलिसांनी युवराजला ताब्यात घेऊन घटनास्थळी आणले. पंचगंगा नदी घाटावर प्रणालीचे चप्पल आढळून आले. पालिकेच्या आपत्कालीन पथकासह जवाहर साखर कारखान्याकडून देण्यात आलेल्या बोटीद्वारे प्रणालीचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र अंधारामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली. पुन्हा मंगळवार पहाटेच्या सुमारास शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे.

प्रणाली हिची आई रक्षा बंधनानिमित्त घरी स्नेहभोजनाच्या तयारीत गुंतल्याचे साधून युवराजने प्रणालीला फिरायला जाऊया, असे सांगून बाहेर पडला. इचलकरंजीत हुपरी रस्त्यालगत असलेल्या पंचगंगा नदी घाटावर आणून तिला अत्यंत निर्दयपणे नदीत ढकलून दिले. त्यानंतर हुपरी पोलिस ठाण्यात जाऊन त्याने प्रणाली बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news