काय त्यो पाऊस…काय त्यो चिखलगुट्ठा अन काय ती भातरोप… सगळच ओक्केमध्ये हाय…! | पुढारी

काय त्यो पाऊस...काय त्यो चिखलगुट्ठा अन काय ती भातरोप... सगळच ओक्केमध्ये हाय...!

कौलव : पुढारी वृत्तसेवा; यंदा पावसाने महिनाभर दडी मारल्यामुळे चिंताक्रांत झालेल्या बळीराजाला दमदार पावसाने आधार दिला आहे. त्यामुळे भातरोपांना कमालीचा वेग आला असून शेतशिवार गजबजला आहे. बरसणारा पाऊस, बैलाव्दारे केला जाणारा चिखलगुठ्ठा, आणि गुडघाभर चिखलात केली जाणारी रोपलागण यातून अस्सल ग्रामीण कृषि संस्कृतीचे दर्शन होत आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगचा अपभ्रंश करून काय त्यो पाऊस…काय त्यो चिखलगुठ्ठा अन काय ती रोपलावण…सगळ ओक्केमध्ये हाय…!असा डायलॉग शेतशिवारातून ऐकायला मिळत आहे.

राधानगरी तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सतरा हजार हेक्टर वर पिकांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी बहुतांश पेरण्या आटोपल्या असून साडेनऊ हजार हेक्टरवरील भातरोपांच्या लागवडीला सुरूवात झाली आहे. दरवर्षी जूनच्या मध्यावरच भातची लागवड उरकल्या जायच्या. मात्र पावसाअभावी भातची लागवड खोळंबली होती. गेल्या चार दिवसात दमदार पावसामुळे भात रोपांच्या लागडीला कमालीचा वेग आला आहे. मजूर टंचाई असली तरी एकमेकाला सहकार्य करत भात रोपा उरकल्या जात आहेत. भल्या सकाळी शेतात जाऊन भाताचा तरवा(रोपे) काढून त्याच्या पेंड्या बांधण्याची धांदल उडालेली असते. पाठोपाठ बैलाचे औत अथवा रोटावेटरने चिखलगुट्टा केला जातो. बऱ्याच ठिकाणी खोऱ्यानेच चिखलगुट्टा केला जात आहे. दुपारनंतर भात रोप लागणीची धांदल उडते.भरपावसात गुडघाभर चिखलातील हे संपुर्ण काम अतिशय कष्टप्रद असते.

सातत्याने बरसणाऱ्या पावसात डोक्यावर असणारी खोळ वा इरले सांभाळत शेती कामे करायची म्हणजे एक कसरतच असते. मात्र ग्रामीण भागात आजही ही कसरत यशस्वीपणे पार पाडली जात आहे. ग्रामीण कृषी संस्कृतीत आजही जुनी कृषी गीते म्हटली जातात. महिलावर्ग भर पावसातही कृषी गीताना उजाळा देत आहेत. तर पुरुष वर्गाला आमदार शहाजीबापू पाटील यांच्या त्या डायलॉग ने चांगलीच भुरळ घातली आहे. काय ते डोंगार काय ती झाडी! काय ते हॉटेल सगळं ओक्के मध्ये आहे. हा डायलॉग घरोघरी पोहोचला आहे. त्याच्या प्रतिक्रिया शेती कामात ही उमटत आहे.

‘आईला काय सांगत आहेस, तुला आता सोडतच नाही’ म्हणत धारदार चाकूने केला पत्नीचा खून; पतीला हडपसर पोलिसांकडून बेड्या

राज्यात अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींची चर्चा शेत शिवारात ही रंगली आहे. आमदार पाटील यांच्या त्या डायलॉगचा अपभ्रंश करून ‘काय त्यो पाऊस काय त्यो चिखलगुट्टा आणि काय ती रोप लागण सगळ ओक्के’ मध्ये आहे. असा डायलॉग शेत शिवारात सर्वांची करमणूक करत आहे. बरसणाऱ्या पावसात गुडघाभर चिखलात रोप लागण करता करता म्हटल्या जाणाऱ्या डायलॉगने ग्रामीण कृषी जीवनातील शेतकऱ्याच्या कष्टाच्या व दुःखाच्या नेमक्या वर्मावरच बोट ठेवले जात आहे.त्याचबरोबर भर पावसातही ढोरकष्ट उपसतानाही कृषी संस्कृतीत शेतकऱ्याच्या अंगी असणाऱ्या समाधानाचे दर्शनही होते.

Back to top button