वरद पाटील निर्घृण खून : सांत्वन करताना हसन मुश्रीफही गहिवरले | पुढारी

वरद पाटील निर्घृण खून : सांत्वन करताना हसन मुश्रीफही गहिवरले

मुदाळतिट्टा : पुढारी वृत्तसेवा

सोनाळी ता. कागल येथील वरद पाटील याच्या निर्घृण खुनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असे शोकमग्न उद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. मंत्री मुश्रीफ यांनी सोनाळी येथे पाटील कुटुंबीयांच्या घरी भेटून कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबियांनी केलेल्या आक्रोशामुळे मंत्री हसन मुश्रीफ गहिवरले.

सायंकाळी चारच्या सुमाराला मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सोनाळी ता. कागल येथे पाटील कुटुंबियांच्या घरी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांसह कुटुंबियांनी क्रूरकर्मा मारुती वैद्य याच्याविषयी तीव्र व संतप्त भावना व्यक्त केल्या. त्या नरकासुराला फाशी झालीच पाहिजे, सात वर्षाच्या वरद पाटील याचा अमानुष खून करणाऱ्या त्या क्रूरकर्म्याला ठार मारा, अशा भावना कुटुंबियांनी व्यक्त केल्या.

मंत्री श्री.मुश्रीफ कुटुंबियांशी बोलताना म्हणाले, समाज माध्यमांमधून घटना समजताच काळीज अक्षरशः हेलावून गेले. सात वर्षे वयाच्या या निष्पाप जिवाचा काय गुन्हा होता? पोलिसांनी पकडलेला आरोपी मारुती वैद्य व अजूनही कोणी या गुन्ह्यात सहभागी असतील तर त्या सर्वांना कठोरात कठोर शिक्षा होईल. माणुसकीला काळीमा फासणारी ही गंभीर घटना आहे.

यावेळी गणपतराव फराकटे, सत्यजित पाटील, प्रविंसिंह भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील अशोकराव चौगले, पंचायत समितीचे माजी सभापती भुषण पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. तसेच ग्रामस्थही मोठ्या संख्येने जमले होते.

मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासमोर वरदचे आई-वडील व आजी-आजोबांनी फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. साहेब, त्या नराधमाने सात वर्षाच्या आमच्या बाळाला तडफडून, टाचा घासून मारले हो! त्याला जिवंत जाळा, फाशी द्या, असा आक्रोशही कुटुंबीयांनी केला. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ गहिवरले व त्याना अश्रू अनावर झाले.

हेही वाचले का?

Back to top button