कोल्‍हापूर : जिल्‍ह्यात पावसाचा जोर वाढला; पंचगंगेची पातळी २४.५ फुटांवर, १४ बंधारे पाण्याखाली

file photo
file photo

कोल्‍हापूर ; पुढारी ऑनलाईन जिल्ह्यात साेमवार (दि. ४) पासून पावसाचा जोर वाढला. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत २४ तासात १० फुटाने वाढ झाली आहे. आज (मंगळवार) सकाळी आठ वाजेपर्यंत पाण्याची पातळी 24.5 फुटावर गेली असून, जिल्ह्यातील १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोल्हापूर-खारेपाटण मार्गावर भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. बर्की (ता. शाहूवाडी) येथे अडकलेल्या 80 पर्यटकांची सुटका करण्यात आली. हवामान विभागाने शुक्रवार, दि. 8 पर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दक्षतेचे आदेश दिले. कोल्हापूर शहरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 21 मि.मी.पावसाची नोंद झाली.

मान्सूनच्या आगमनानंतर प्रथमच सोमवारी शिरोळ आणि हातकणंगले तालुका वगळता जिल्ह्याच्या बहुतांशी भागांत दमदार पाऊस झाला. दुपारी बाराच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाचा जोर सायंकाळपर्यंत कायम होता. काही काळ मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्याच्या धरण क्षेत्रांत पावसाचा जोर अधिक होता. पावसाने शासकीय कार्यालये ओस पडली होती. आठवड्याचा पहिला दिवस असूनही तुलनेने गर्दी कमीच होती.

पंचगंगा नदीचीही पाणी पातळी वाढल्याने सायंकाळी साडेसात वाजता राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. खरबदारीचा उपाय म्हणून या बंधार्‍यावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली. राजाराम बंधार्‍यावरून सध्या 8 हजार 156 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. राजाराम बंधार्‍यासह भोगावती नदीवरील हळदी, कोगे, कुंभी, मांडुकली हे बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. सोमवारी दिवसभरात पाच बंधार्‍यांवर पाणी आले. रूई आणि इचलकरंजी हे बंधारे यापूर्वीच पाण्याखाली गेले आहेत.

भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून पाच किलोमीटर अंतरावर दुपारी दरड कोसळली. यामुळे कोल्हापूर-खारेपाटण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दरड हटवण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले होते. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक करूळ घाटमार्गे वळवण्यात आली होती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news