म्हैसाळ हत्याकांड : मांत्रिकाला विषारी गोळ्या पुरविणारे चौघे ताब्यात | पुढारी

म्हैसाळ हत्याकांड : मांत्रिकाला विषारी गोळ्या पुरविणारे चौघे ताब्यात

मिरज; पुढारी वृत्तसेवा : म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबाच्या हत्याकांडमध्ये मांत्रिकांकडून विषारी गोळ्यांचा वापर करण्यात आला होता. मांत्रिकाला विषारी गोळ्यांचा पुरवठा केल्याच्या संशयातून चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने पुण्यातून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे विषारी गोळ्याबाबत कसून चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

गुप्तधन शोधून देण्याच्या बहाण्याने मांत्रिक आब्बास बागवान याने डॉ. माणिक वनमोरे आणि निवृत्त शिक्षक पोपट वनमोरे यांच्याकडून लाखो रुपये घेतले होते. वनमोरे कुटुंबियांनी ते पैसे कर्ज घेऊन त्यांना दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. परंतु गुप्तधन न मिळाल्याने वनमोरे कुटुंबियांनी मांत्रिक बागवान याच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता. या तगाद्यामुळे बागवान याने त्याचा साथीदार धीरज सुरवशे याच्या मदतीने वनमोरे कुटुंबाचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले. दि. 20 जून रोजी घरात गुप्तधन शोधण्यासाठी पूजा करण्याच्या बहाण्याने सर्व सदस्यांना एकत्रित जमण्यास सांगितले. त्यानंतर डॉ. माणिक आणि पोपट यांच्या घरात जावून प्रत्येकाला अकराशे गहू सातवेळा मोजण्यास दिले. या कालावधीत मांत्रिकाने विषारी गोळ्याचे पूड करून त्याचे द्रव करून नऊ बाटल्यांमध्ये घातले. त्यानंतर ते सर्वांना पिण्यास देऊन हे हत्याकांड केले होते.

या हत्याकांडमध्ये विषारी गोळ्यांचा तपास महत्वाचा असल्याने पोलिसांकडून त्या गोळ्या कसल्या होत्या, त्या कोठे तयार करण्यात आल्या, या गोळ्यांचा पुरवठा कोणाकडून करण्यात येतो, ती कंपनी कोणती? याचा तपास करण्यात येत होता. तपासादरम्यान मांत्रिकाने काही जणांकडून या गोळ्या घेतले असून ते संशयित सध्या पुण्यात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पुण्यात छापे टाकून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे विषारी गोळ्याबाबत कसून चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, मांत्रिकाची बहीण गुन्हा घडल्यापासून फरारी आहे. तिच्या मागावर देखील स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक रवाना करण्यात आले आहे. तिला ताब्यात घेतल्यानंतर तिचा या गुन्ह्यात कितपत सहभाग होता? तिच्या बँक खात्यावर काही रक्कम घेण्यात आली आहे का? रक्कम घेतली असेलतर ती कोणाकडून घेतली? याबाबत तपास करण्यात येत आहे. परंतु अद्याप मांत्रिकाची बहीण पोलिसांच्या हाती लागली नसून लवकरच तिला ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विषारी गोळी तयार करणार्‍या कंपनीचा लवकरच छडा?

गुन्हा करीत असताना मांत्रिकाने संपूर्ण दक्षता घेतली असल्याचे दिसून येते. कोणत्याही प्रकारचा संशय येऊ नये यासाठी त्याने अशा विषारी गोळ्या देऊन नऊ जणांची हत्या केली. विषारी गोळ्याबाबत तपास करीत असताना पोलिस देखील चक्रावले होते. आता त्या गोळ्यासंदर्भातील तपासाला गती मिळाली असून चौघांकडून गोळ्यांबात चौकशी करण्यात येत आहे. लवकरच त्यांच्याकडून त्या गोळीचे नाव आणि ती तयार करणार्‍या कंपनीचा छडा लागेल, असे पोलिसांनी सांगितले.

Back to top button