

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : वाढत्या उष्मामुळे शाहूवाडी तालुक्यात पाण्याची मागणी वाढू लागली आहे. बाष्पीभवनामुळे गेल्यावर्षी तुडुंब भरलेल्या तालुक्यातील धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. कासारी धरणात (Kasari Dam) २० मेअखेर २४.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून १९.२९ दलघमी उपयुक्त साठा आहे. या धरणाच्या पाणीसाठ्यावर शाहूवाडी तालुक्यातील २० तर पन्हाळा तालुक्यातील ४१ गावांचा पाणीपुरवठा कार्यान्वित आहे. कासारी पाणलोट क्षेत्रातील सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत घट आहे. पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
कासारी (Kasari Dam) पाणलोट क्षेत्रात कासारी (गेळवडे) या प्रमुख मध्यम प्रकल्पासह पडसाळी, पोंबरे, नांदारी, कुंभवडे व केसरकरवाडी हे लघु पाटबंधारे प्रकल्प येतात. कासारी नदीवर १९७७ मध्ये कासारी मध्यम जलाशयाच्या कामाला सुरुवात झाली. ३३.२८ चौरस किमी पाणलोट क्षेत्रात ७८.५६ दलघमी साठा व्हावा, अशी आखणी केली. गेळवडे, गजापूर गावांचे पुनर्वसन झाल्याने ३८०.३० मीटर लांबीचा हा प्रकल्प साकारला. मुख्य धरणाची क्षमता २.७७ टीएमसी आहे. या प्रकल्पामधून शाहूवाडी तालुक्यातील २० गावे व पन्हाळा तालुक्यातील ४१ गावांतील ९ हजार ४५८ एकर सिंचन क्षेत्राला हा प्रकल्प जीवनदायी ठरला आहे. पाणी अडविण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे १४ बंधारे आहेत. गतवर्षी २० मेला कासारी धरणात २९ टक्के पाणीसाठा होता. सध्या तो २४.७३ टक्के म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत चार टक्के कमी आहे.
धरणाची पाण्याची पातळी ६०७.६० मीटर असून उपयुक्त पाणीसाठा १९.२९ द.ल.घ.मी (०.६८ टीएमसी) म्हणजेच २४.७३ टक्के इतका आहे. गतवर्षी याच दिवशी पाणीपातळी ६०९ मीटर तर पाणीसाठा २३.४० दलघमी इतका होता. गतवर्षीपेक्षा धरणात चार टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यावेळी धरणात ( ०.८१ टीएमसी) म्हणजेच २९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. सध्या धरणातून २५० क्यूसेस पाण्याचा कासारी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. धरणातील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. सध्याचा पाणीसाठा जरी मुबलक असला तरी धरणातील गाळ व मृतसाठा वजा करता उपयुक्त पाणीसाठा मॉन्सून सुरु होईपर्यंत पुरविण्याची आवश्यकता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने मान्सूनपूर्व नियोजनाची गरज आहे. तालुक्यात उन्हाचा पारा ३६ ते ३८ अंश सेल्सिअस राहत असल्याने तालुक्यातील धरणातील पाण्याची पातळी घटू लागली आहे.
सध्या धरणात पाण्याची पातळी ६०७.६० मीटर इतकी आहे. हीच पातळी गेल्यावर्षी ६०९ मीटर होती. तर धरणात आज ०.६८ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. हाच पाणीसाठा गेल्यावर्षी ०.८१ टीएमसी इतका होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ०.१३ टीएमसी म्हणजे ४ टक्के पाणीसाठा कमी आहे.
हेही वाचा