सर्पदंशामुळे शुद्ध हरपलेला तरुण 12 दिवसांनंतर ठणठणीत ; सीपीआरच्या वैद्यकीय पथकाने घेतले परिश्रम

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा भुदरगड येथील 26 वर्षांच्या तरुणाला सर्पदंश झाला होता. सर्पदंशानंतर तरुणाची शुद्ध हरपून पॅरालेसिस झालेल्या अवस्थेत नातेवाईकांनी त्याला सीपीआरमध्ये दाखल केले होते. वैद्यकीय पथकांनी परिश्रम घेतल्याने तब्बल 12 दिवसांनंतर तो तरुण ठणठणीत बरा झाला आहे. मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून तरुणाला जीवदान दिल्याने वैद्यकीय पथकाचे नातेवाईकांनी आभार मानले.
वासनोली (ता. भुदरगड) येथील महेश पाटील सिव्हिल इंजिनिअर आहे. मध्यरात्री झोपेतच त्याला सर्पदंश झाला. मण्यारसारख्या अतिविषारी सापाने चावा घेतल्यामुळे त्याच्या शरीरात जहाल विष भिनलं. कुटुंबीयांनी महेशला उपचारासाठी गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचारनंतर त्याला सीपीआरमध्ये हलविले. सर्पदंश झाल्यापासून सीपीआरमध्ये पोहोचण्यास तब्बल अडीच ते तीन तासांचा वेळ लोटला होता. याच दरम्यान त्याची शुद्ध हरपली, श्वास मंदावला आणि अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे त्याची प्रकृती अधिक गंभीर बनली होती.
सीपीआरचे मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. महेंद्र बनसोडे, डॉ. अनिता परितेकर आणि त्यांच्या पथकाने महेशवर उपचार सुरू केले. सलग पाच दिवस त्याला सर्पदंशावरील अत्यंत महागड्या लसी दिल्या. तसेच अतिउच्च अँटीबायोटिक्स दिली. त्यामुळेच महेशच्या प्रकृतीत दिवसागणिक सुधारणा होत गेली. त्यानंतर त्याला दुसर्या विभागात हलविले. तेथे त्याच्यावर सात दिवस उपचार झाले. तब्बल 12 दिवसांनी त्याची प्रकृती ठणठणीत झाल्याची माहिती सीपीआर प्रशासनाने दिली.
हेही वाचा