मुंबई : पुढारी वृत्तसेवा
विधान परिषद निवडणुकीचे मतदान आता अंतिम टप्प्यात आले असून तीन चार आमदारांचे मतदान शिल्लक आहे. अशावेळी भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा निकालही राज्यसभेप्रमाणेच लागेल, असा दावा केला आहे.
सत्ताधारी महाविकास आघाडीच्या विरोधात त्यांच्याच आमदारांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी राज्यसभा निवडणुकीत दिसून आली. आता विधानपरिषद निवडणुकीतही ती व्यक्त होणार आहे. भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे दोन आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. हा दावाही मुनगंटीवार यांनी खोडून काढला. एकनाथ खडसे हे गेली तीस चाळीस वर्ष भाजपमध्ये होते. त्यामुळे त्यांचे भाजप आमदारांशी सबंध असेल तरी ते त्यांना मतदान करतील, अशी शक्यता नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.