Agnipath Protest : 'अग्निपथ' योजनेविरोधात सोमवारी कोल्हापूरमध्ये मोर्चा | पुढारी

Agnipath Protest : 'अग्निपथ' योजनेविरोधात सोमवारी कोल्हापूरमध्ये मोर्चा

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ  (Agnipath Protest) या भरती प्रक्रिया विरोधात संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये रोष पाहावयास मिळत आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीदेखील या योजनेचा विरोध केला आहे. राज्यामध्ये अग्निपथ विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या कृती समितीच्या वतीने राज्यभरात आंदोलनाची घोषणा केली आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर येथे सोमवारी (दि. २०) सकाळी दहा वाजता सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांचे एकत्रित आंदोलन टेंबलाई मंदिर कोल्हापूर येथे करण्यात येणार आहे. त्यानंतर आर्मी भरती कार्यालय व कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

(Agnipath Protest) गेल्या तीन वर्षापासून कोरोनामुळे जवानांची भरती होऊ शकली नाही. गेली अनेक वर्षे सैन्यदलामध्ये भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांमध्ये यामुळे अस्वस्थता पसरली आहे. भरती केव्हा सुरू होणार याची उत्सुकता लागलेली असतानाच संरक्षण मंत्रालयाने नियमित भरती प्रक्रिया स्थगित करून अग्निपथ या हंगामी भरती योजनेची घोषणा केली आहे.

एकीकडे भविष्याची तजवीज म्हणून युवक सरकारी नोकरी कडे पहात असतात मात्र सैनिक भरती मध्ये केवळ उमेदीची चार वर्ष नोकरी झाल्यानंतर पुढील कोणतीही हमी अग्निपथ या योजनेमध्ये सरकारने दिली नाही. याशिवाय २०२० साली घेण्यात आलेल्या शारीरिक व वैद्यकीय चाचण्या मध्ये पास झालेल्या युवकांची देखील लेखी परीक्षा घेऊन नियुक्ती अद्याप दिलेली नाही. तसेच २०२०-२१ सालच्या नियमित भरती प्रक्रिया देखील अद्याप प्रलंबित आहेत.

केंद्र सरकार अग्निपथ योजनेमुळे जवानांच्या संख्येत वाढ होणार असल्याचे सांगत असले तरी देखील सरासरी एका वर्षी अग्निपथ योजनेतून एका तालुक्यातील फक्त साठ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळणार आहे. यापूर्वी हाच आकडा साधारणपणे १०० पेक्षा जास्त होता. गेल्या आठ वर्षांमध्ये मोदी सरकारने अनेक वादग्रस्त निर्णय घेतले. नोटबंदी, जीएसटी, शेतकरी कायदे आणि अग्निपथ हे निर्णय घेताना लोकशाहीची जाणीव ठेवून समाजातील प्रतिनिधींकडून मत जाणून घेतले नाही. त्यामुळे केंद्र सरकारला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व संदीप गिड्डे पाटील करत असून संयोजन राहुल पाटील, समाधान पाटील, आनंदराव पवार, अखिलेश वाले, आण्णासाहेब काकडे, महेश बोरनाक, तानाजी डोईफोडे, प्रकाश थोरबोले, गणेश गारळे, सुशांत मिसाळ, संदीप कोळी, विजय वाघरे, दयानंद साळवी, सुरज गावडे, अभिजीत पाटील, दयानंद किल्लेदार, योगेश पाटील, सुनिल पाटील, मनोज गायकवाड, अमित मालगावे, संपत सावंत करीत आहेत.

 

हेही वाचलंत का ? 

Back to top button