यावर्षी मत्स्य खवय्यांसाठी गोठवले 100 टन मासे

यावर्षी मत्स्य खवय्यांसाठी गोठवले 100 टन मासे
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : माशांच्या प्रजनन कालावधीमुळे समुद्रातील मासेमारी दरवर्षी 31 जुलैपर्यंत बंद ठेवली जाते. या काळात माशांवर ताव मारणार्‍या खवय्यांची मोठी पंचाईत होते. हे लक्षात घेवून मुंबईतील मासळी व्यावसायिकांनी यावर्षी 100 टन मासे गोठवून ठेवले आहेत. यापैकी मंगळवार आणि गुरुवार वगळता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये सुमारे 4 ते 5 टन मासे विक्रीसाठी येत आहेत. येथून ते राज्यभरात पाठवले जातात.

1 जून ते 31जुलै या काळात मासेमारीसाठी एकही बोट समुद्रात जात नसल्यामुळे जूनअखेर येणार्‍या विविध प्रकारच्या माशांची व्यापारी फ्रोझनमध्ये (वातानुकूलित गोदाम) साठवणूक करतात. नवी मुंबई लगतच्या तळोजा येथे अशाप्रकारची गोदामे आहेत. तर रत्नागिरी, गुजरात आणि हावडा येथे प्रत्येकी 1 गोदाम आहेत. पापलेट, हलवा, कोळंबी, सुरमई, बांगडा, रावस, वाम, दाताळ, फळई, कोती, घोळ इत्यादी माशांची येथे साठवणूक केली आहे. येथील मासे किमान आठ महिने ताजे राहतात, असा दावा महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी केला आहे.

तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये 16 एप्रिल ते 16 जून 2022 या कालावधीत प्रजननासाठी मासेमारी बंद असते. 17 जूनपासून या राज्यात मासेमारी सुरु होणार आहे. तिकडे अधिक मासेमारी झाल्यास मुंबई आणि पुणेकरांना ताजी मासळी मिळेल, असा दिलासाही त्यांनी दिला. केंद्र आणि राज्य सरकार अनुदान देत नसल्यामुळे फ्रोझनवर अनेक वर्षांपासून अमराठी आणि मोठ्या भांडवलदारांची मक्तेदारी आहे. रत्नागिरीतील दीपक गद्रे वगळता सध्या एकाही मराठी माणसाच्या मालकीचे असे गोदाम नाही. तळोजा येथे दोन मराठी बांधवांनी अशी गोदामे उभी केली. पण दीर्घ अनुभव असणार्‍या व्यापार्‍यांनी त्यांचा टिकाव लागू दिला नाही, अशी खंत मत्स्य व्यावसायिक पांडुरंग टिळे यांनी व्यक्त केली.

भारताचे मासे स्वत:चे दाखवून विकतोय चीन

मोठ्या व्यापार्‍यांकडून पालघर, डहाणू, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील दर्जेदार मासळी चीनला निर्यात केली जाते. हीच मासळी आकर्षक पॅकिंग करून चीन आपले शिक्के मारून जगाच्या मार्केटमध्ये विक्री करत आहे. मासळी भारताची असतानाही आपले उत्पादन दाखवून चीन मासेमारीमध्ये आपण नंबर एक असल्याचे जगाला सांगत आहे. केंद्र सरकारने या विरोधात एकदाही आवाज उठवला नसल्याचे टिळे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news