कोल्‍हापूर : टाकळीवाडीत मंदिराच्या वास्‍तुशांतीत विधवा महिलांना दिला पूजेचा मान | पुढारी

कोल्‍हापूर : टाकळीवाडीत मंदिराच्या वास्‍तुशांतीत विधवा महिलांना दिला पूजेचा मान

कुरुंदवाड : जमीर पठाण; टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथे ताईबाई मंदिराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमात देवीच्या ओटी भरणी व विधिवत पूजा करण्याचा मान विधवा महिलांना देण्यात आला. शोभा विठ्ठल निर्मळे, चंदाबाई आप्पासाहेब निर्मळे, रेशमा बजरंग निर्मळे आणि सरिता विलास निर्मळे या विधवा भगिनींनी ताई बाईची ओटी भरून पूजा-अर्चा केली.

या उपक्रमाची ग्रामपंचायतीने दखल घेऊन विधवा महिलांच्या पुनर्विवाहासाठी 10 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. लवकरच विधवा प्रथा बंदीचा ठराव ग्रामपंचायत करणार असल्याची घोषणा ग्रा. स तुकाराम चिगरे यांनी केली.

विधवा प्रथा बंदीचा हेरवाड पॅटर्न राज्यात राबवला जात असताना शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील चर्मकार समाज बांधवांच्या ताई-बाई मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम पुरोगामी पध्दतीने पार पडला. आज (शुक्रवार) या मंदिराच्या वास्तुशांती, पूजा-अर्चा, देवीची ओटी भरणे, हळदीकुंकू आदी विधिवत कार्यक्रम विधवा महिलांच्या हस्ते चर्मकार समाजाने राबवून एक वेगळा संदेश समाजासमोर ठेवला आहे.

हेरवाड पॅटर्नचे अनुकरण खेड्यापाड्यातील ग्रामपंचायतीतून केलं जात आहे. ही भूषणावह बाब असून, विधवा प्रथा बंदीच्या परिवर्तनाला सुरवात झाली असून, विधवा महिलांना समाजात चांगले स्थान निर्माण होताना दिसत आहे. सामाजिक मानसिकतेत बदल होत असल्याने ही बाब खरोखरच उल्लेखनीय म्‍हणावी लागेल.

टाकळीवाडी येथील ताईबाई मंदिरात ओटी भरणे व पूजा-आर्चेचा मान आम्हा विधवा महिलांना देऊन सुवासिनीचा मान दिला आहे. ग्रामपंचायत व चर्मकार समाजाने विधवा प्रथा बंदीचा हेरवाड पॅटर्न आमच्या गावात सुरू केला आहे. पुजा-आर्चेच्या कार्यक्रमात सुवासिनींचा मान देऊन एक समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. तो आदर्श देशातील इतर ग्रामपंचायतींनीही घ्यावा असे मत श्रीमती रेश्मा निर्मळे यांनी व्यक्त केला.

ग्रामपंचायतीने मंदिरात सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमाची दखल घेतली आहे. विधवा प्रथा बंदीचा ठराव लवकरच मंजूर करून विधवा महिलांच्या सबलीकरणासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्‍य चिंगरे यांनी सांगितले. तसेच विधवा झालेल्या महिलांना पुनर्विवाहासाठी 10 हजार रुपये अनुदान देण्याचीही घोषणा त्‍यांनी यावेळी केली.

यावेळी सरपंच लक्ष्मीबाई बिरणाळे, उपसरपंच बाजीराव गोरे, आप्पासाहेब निर्मळे रमेश निर्मळे मोहन निर्मळे मल्लाप्पा निर्मळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हे ही वाचलंत का?   

Back to top button