कोल्हापूर : आकाशात दिसलेला ‘तो’ पांढराशुभ्र गोल तबकडी की अन्य काही, महत्वाची माहिती आली समोर | पुढारी

कोल्हापूर : आकाशात दिसलेला 'तो' पांढराशुभ्र गोल तबकडी की अन्य काही, महत्वाची माहिती आली समोर

पन्हाळा : राजू मुजावर : पन्हाळा गडावर आकाशात पश्चिम दिशेला उंच पांढराशुभ्र व चकाकत असलेल्या बलून आकाराचा एक गोल दिसला होता? हा गोल पन्हाळकरांच्या कुतूहलाचा विषय ठरला. आज (दि.२) सकाळी तब्बल दोन तास सकाळी सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत पश्चिमेला आकाशात उंच असा बलून सदृश एक पांढरा शुभ्र गोल अचानक दिसत होता. हा गोल अत्यंत कमी वेगाने पुढे सरकत असल्याचे जाणवले, असे पन्हाळा येथील रमेश पाटील, दीपक दळवी, अस्मिता पाटील, मालती पाटील, सीमा माळी, विजय कुराडे यांनी सांगितले.  नवे पारगाव येथील प्रा. चंद्रकांत राजे, प्रा. प्रवीण पगारे यांनीदेखील याबाबत दुजोरा दिला.

हा प्रखर चमकत असलेला गोल उत्तर दिशेला सरकत गेला आणि मग पन्हाळ्यातून दिसेनासा झाला, असे रमेश पाटील यांनी सांगून या घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ केला असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पन्हाळा येथे शिवाजी विद्यापीठाचे अवकाश संशोधन केंद्र आहे, या केंद्राचे संचालक डॉ. प्रा राजीव व्हटकर आसाम येथे आहेत. त्यांच्याशी याबाबत दूरध्वनीवरून संपर्क साधला. आणि त्यांना अवकाशात दिसलेल्या गोलाचे फोटो व व्हिडिओ पाठवले. याचे निरीक्षण करून त्यांनी सांगितले की, अवकाशात दिसलेला हा तेजपुंज हा हवामान खात्याने हवामानाचा अंदाज घेण्यासाठी सोडलेला बलून असावा. सूर्याची किरणे पडल्यानंतर हा बलून चमकतो. त्यामुळे अत्यंत प्रखर असा तो दिसत असावा. सध्या मान्सूनचे वातावरण आहे. त्या दृष्टीने वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी असे बलून सोडले जातात. जगभरात दररोज असे बलून सोडून हवामानाचा अंदाज घेतला जातो.

ते पुढे म्हणाले की, हवामानातील आर्द्रता तपासली जाते, वाऱ्याची दिशा तपासली जाते, यामध्ये खालील बाजूस हवामानाचा अंदाज घेण्यासाठी काही उपकरणे बसवलेले असतात. हा बलून नंतर फुटतो. यामध्ये बसवलेले उपकरण खाली पडते, त्याचा शोध घेतला जातो. त्याच्यावर हवामान खात्याने पत्ता लिहिलेला असतो. जीपीएसमुळे डेटा उपकरण पडल्याचे नेमके स्थान कळते. हे उपकरण ताब्यात घेतले जाते. पश्चिमेला दिसलेला हा बलून कदाचित गोवा हवामान खात्याने सोडला असावा, असे डॉ. व्हटकर यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button