आर्थिक घोटाळ्यांविरोधातील नवे पर्व म्हणजे फॉरेन्सिक अकाऊंटिंग : डॉ. अपूर्वा जोशी | पुढारी

आर्थिक घोटाळ्यांविरोधातील नवे पर्व म्हणजे फॉरेन्सिक अकाऊंटिंग : डॉ. अपूर्वा जोशी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : आर्थिक घोटाळ्यांच्या विरोधातील नवे पर्व म्हणजे फॉरेन्सिक अकाऊंटिंग. ‘सत्यम’चा घोटाळा उघडकीस आला आणि अवघा देश आर्थिक घोटाळ्याबद्दल बोलू लागला. यानंतर कोळसा, थ्रीजी, कॉमनवेल्थ, आदर्श, सिंचन, सत्यम असे नवनवीन घोटाळे उघड झाले आणि फॉरेन्सिक अकाऊंटिंग या क्षेत्राबाबत लोकांना माहिती होवऊ लागली, असे प्रतिपादन डॉ. अपूर्वा जोशी यांनी केले. त्या डॉ. व्ही. टी. पाटील सभागृह येथे दै.‘पुढारी’ आयोजित एज्यु दिशा प्रदर्शनात फॉरेन्सिक अकाऊंटमधील ग्लोबल करिअर या विषयावर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक व्यवस्थापक राजेंद्र मांडवकर उपस्थित होते.

कॉमर्स म्हटलं की सी.ए., म्हणजे चार्टर्ड अकाऊंट ही उच्च पदवी इतकंच ज्ञात होतं. मात्र, या चाकोरीबाहेरही करिअरच्या ग्लोबल संधी असल्याचे वर्तमानपत्रातील मयूर जोशी यांच्या प्रसिद्ध झालेल्या लेखामधून समजले. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या क्षेत्राची करिअर म्हणून निवड केली. फॉरेन्सिंग म्हटलं की डोळ्यासमोर येते ते सायन्स. मात्र, याशिवायही तपासाचे क्षेत्र आहे, याबाबत आजही अनेकजण अनभिज्ञ आहेत. अकाऊंटिंग, तंत्रज्ञान आणि तपासकार्य अशी सर्व प्रकारची कौशल्य एकत्ररीत्या उपयोगात आणून न्यायालयात सादर करता येतील, असे ठोस पुरावा शोधणे वा मिळवणे ही या क्षेत्राची खरी ओळख असल्याचे अपूर्वा यांनी सांगितले.

कॉर्पोरेट जगतातील महाघोटाळे कंपनीला नुकसान करतात. अनेक कंपन्या या नव्या समस्येशी लढण्याकरिता सरसावल्या आहेत. मात्र, या लढाईत लढणार्‍या शिलेदारांची आवश्यकता असून करिअरच्या अनेक संधी तरुणाईसाठी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. या क्षेत्रात येण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंट असणे बंधनकारक नाही. त्यासाठी
अकाऊंटचे सखोल ज्ञान, न्यायव्यवस्थेचे ज्ञान, तंत्रज्ञानाची माहिती आदी गुण अंगभूत असलेली व्यक्ती या क्षेत्रात प्रवेश करू शकते. शोधाचा ध्यास घेण्याची वृत्ती मात्र कायम हवी, असे सांगत असतानाच अपूर्वा म्हणाल्या, काळासोबत नवनवीन घोटाळ्यांच्या पद्धती जन्माला येऊन फॉरेन्सिक अकाऊंटंटस्ना कामाचा तुटवडा भासणार नाही, हे निश्चित.

Back to top button