चंदगड ; नारायण गडकरी : बैलगाडी शर्यतीत नेहमी वरच्या क्रमांकावर राहणारा आणि 175 हून अधिक स्पर्धेतून दीडशे बक्षीसे खेचून आणणारा, रामपुर- डुक्करवाडी गावातील सुहास वर्पे यांच्या 'गुलब्या' बैलाचे अचानक निधन झाले. लाडक्या गुलब्या बैलाला अखेरचा निरोप देताना शर्यतप्रेमींसह अख्खा गाव ढसाढसा रडला.
गावाचं नाव महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात बैलगाडी शर्यतीतून आजरामर केलं, अशा गुलब्या बैलाच्या जाण्याने रामपुर- डुक्करवाडी गाववर शोककळा पसरली. सुहास वर्पे यांनी पाळलेल्या खिल्लार जातीच्या बैलाने दीडशेहून अधिक बक्षिसे पटकावली आहेत.
पाच मोटारसायकल आणि सोन्या-चांदीची बक्षिसे मिळवून मालकाचा नावलौकिक वाढवला. त्याच्या मृत्यूने वरपे कुटुंबीयांना धक्का बसला. गावातून मिरवणूक काढून त्यांनी लाडक्या बैलाला अखेरचा निरोप दिला. चंदगड आजरा गडहिंग्लजसह कर्नाटकातील बैल प्रेमीं अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
महाराष्ट्रासह कर्नाटकातील अथनी, रायबाग, बागलकोट, मुधोळ पर्यंत या बैलाने शर्यती जिंकल्या होत्या. गुलब्याला 5 लाख 51 हजार रुपये अशी मागणी झाली होती. पण मालकाने विकण्याचा बेत रद्द केला. गेले चार दिवस किरकोळ आजाराने तब्येत खालावली आणि गुलब्याने अखेरचा श्वास घेतला.