सीपीआर मदर मिल्क बँकेसाठी फुटला पान्हा; मातांकडून दुधाचे दान सुरू | पुढारी

सीपीआर मदर मिल्क बँकेसाठी फुटला पान्हा; मातांकडून दुधाचे दान सुरू

कोल्हापूर; एकनाथ नाईक: नवजात अर्भकांना आईचे दूध अमृतासमान असते; पण काही मातांना पान्हाच फुटत नाही. त्यामुळे अर्भकांची भूक भागविण्यासाठी मातांना गायीचे दूध किंवा बेबी फूड द्यावे लागते. अशा बालकांसाठी ‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे मातृ दुग्धपेढी वरदान ठरते. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सीपीआरमध्ये मदर मिल्क बँक नुकतीच सुरू झाली असून या मदर मिल्क बँकेसाठी पान्हा फुटला आहे. स्वतःच्या बाळाची भूक भागवून राहिलेले दूध माता दान करू लागल्या आहेत. त्यामुळे आईच्या दुधाच्या प्रतीक्षेत असणार्‍या बालकांची भूक या निमित्ताने पूर्ण होत आहे. या मिल्क बँकेत सात मातांकडून सव्वा लिटर दूध जमा झाले आहे.

राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात मदर मिल्क बँक सुरू करण्याचे निर्देश दिले होते. निधीअभावी सीपीआरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या बँकेची प्रतीक्षा होती. जिल्हा प्रशासनाने यासाठी 26 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळेच येथे सुसज्ज मदर मिल्क बँक सुरू झाली आहे; पण दूध दान करण्यासाठी माता पुढे येणार का, हा मोठा प्रश्‍न सीपीआर प्रशासनासमोर उभा होता.

प्रसूती आणि बालरोग विभागातील डॉक्टर, नर्सेस यांनी ही जबाबदारी पेलली. पहिल्या दिवसापासून मदर मिल्क बँकेच्या समन्वयक डॉ. दीपा फिरके, बालरोग विभागप्रमुख सुधीर सरवदे, नर्सेस यांनी अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली मातांचे समुपदेशन सुरू केले. त्यामुळे सात मातांनी पुढे येऊन दूध दान केले असून सव्वा लिटर दूध जमा झाले आहे. या दुधातून बालरोग विभागातील पेटीमध्ये असणार्‍या बालकांची भूक भागू लागली आहे. इतकेच काय, ज्या मातांना दूध नाही, त्या बालकांसाठी हे दूध तर वरदान ठरले आहे. मातांकडून दूध घेतल्यानंतर त्यांच्या विविध तपासण्या केल्या जातात. त्यानंतर हे दूध फ्रिजर करून ठेवले जाते. गरजेनुसार सीपीआरमधील बालकांना ते मोफत दिले जाते.

हेही वाचलंत का? 

सीपीआरमध्ये मदर मिल्क बँक सुरू झाल्याने गरजू बालकांना आईचे दूध देणे शक्य झाले आहे. आईचे दूध म्हणजे बालकांसाठी अमृता समान आहे. दुग्धपेढीत माता स्वेच्छेने येऊन दूध दान करत आहेत. सव्वा लिटर दूध जमा झाले आहे. ते गरजू बालकांना वरदान ठरत आहे.
– डॉ. प्रदीप दीक्षित, अधिष्ठाता, सीपीआर

Back to top button