शिवसेनेतील नाराजीचा स्फोट पाहायला मिळेल – प्रवीण दरेकर | पुढारी

शिवसेनेतील नाराजीचा स्फोट पाहायला मिळेल - प्रवीण दरेकर

सांगली : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना आमदारांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यांच्यातील नाराजीचा स्फोट पाहावयास मिळेल, असे भाकित विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केले. मनसे नेते राज ठाकरे यांना भाजपसोबत घेतल्यास बेरजेचे राजकारण चांगले होईल, असे मतही त्यांनी व्यक्‍त केले. दरेकर म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. समाजातील सर्वच घटक या सरकारच्या कामगिरीवर नाराज आहेत. शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. कर्नाटक, गोवा, गुजरातप्रमाणे महाराष्ट्र सरकारलाही पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करता आले असते; पण महाविकास आघाडीचे सरकार महागाईवरून केवळ केंद्राकडे बोट दाखवत आहे. केंद्राने डिझेल 9.50 रुपयांनी व डिझेल 7 रुपयांनी कमी केले. राज्य सरकारने स्थानिक सेस कमी करून पेट्रोल डिझेलचा दर किमान 3 ते 4 चार रुपयांनी कमी करायला पाहिजे होता.

बियाणे महागले

दरेकर म्हणाले, बि-बियाणे महागले आहे. खते उपलब्ध होत नाहीत. विदर्भ, मराठवाड्यात तीस किलोच्या महाबीजच्या सोयाबीन बियाणाचा भाव 2 हजार 250 वरून 4 हजार 250 रुपये झाला आहे. खासगी बियाणे कंपन्याही दरवाढ करतील. त्यामुळे शासनाने अनुदान देऊन ‘महाबीज’ची दरवाढ मागे घ्यावी.

मुंबईचा महापौर भाजपचाच

दरेकर म्हणाले, हिंदुत्वाबाबत भाजपची भूमिका कायम आहे. मनसे नेते राज ठाकरे हे हिंदुत्वाचा मुद्दा घेवून पुढे जात आहेत. राज ठाकरे यांना सोबत घेतले तर भाजपसाठी बेरजेचे राजकारण होईल. दरम्यान आगामी निवडणुकीत मुंबईचा महापौर भाजपचाच होईल, असेही त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.

ब्रिजभूषण यांना राष्ट्रवादीकडून रसद

राज ठाकरे यांच्या विरोधात भाजपचे खासदार ब्रिजभूषण यांना राष्ट्रवादीकडून रसद पुरवली असल्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्याविषयी ब्रिजभूषण यांची वक्तव्ये, रोहित पवार यांचे मध्येच अयाध्येला दर्शनाला जाणे या काही बाबींवरून सर्वकाही समजून येते. सापळा काय होता हे योग्यवेळी समजून येईल, असे दरेकर म्हणाले. भाजपचे ब्रिजभूषण यांच्यासंदर्भात भाजपचे केंद्रीय नेते योग्य निर्णय घेतील. भाजपने त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला नाही, असेही दरेकर यांनी सांगितले. दरेकर म्हणाले, हर घर जल अंतर्गत नळजोडणीत महाराष्ट्र पिछाडीवर आहे. दीड कोटी लोकांच्या घरात नळ बसविण्याचे उद्दिष्ट आहे. पण हे काम 15 टक्के झाले आहे. अन्य राज्यांमध्ये 25 टक्क्यांहून अधिक उद्दीष्ट पूर्ण आहे. मोदी सरकारला श्रेय जाईल, या भितीने राज्य सरकार राज्य हिस्सा देण्यात टाळाटाळ करत आहे.

दरेकर म्हणाले, छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभा उमेदवारीला सर्वप्रथम महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी पाठिंबा जाहीर केला. त्यांनतर शिवसेना नेते संजय राऊत, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे वक्तव्य व अटी पाहता महाविकास आघाडीचे नेते छत्रपती संभाजीराजे यांचा राजकीय गेम करत नाहीत ना, अशी शंका येत आहे. आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, भाजप नेते शेखर इनामदार, संगीता खोत, दीपक माने, केदार खाडीलकर, अशरफ वांकर उपस्थित होते.

Back to top button