कोल्हापूर : बावीस लाखांची लूट; फिर्यादीच आरोपी | पुढारी

कोल्हापूर : बावीस लाखांची लूट; फिर्यादीच आरोपी

कागल (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा
कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या मार्गावर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या बावीस लाख रुपयांच्या लूट प्रकरणातील फिर्यादीच आरोपी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्‍न झाले. सांगली येथील निलंबित पोलिस कर्मचारी व फिर्यादी आरोपी या दोघांना कागल पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून लुटीतील 22 लाखांपैकी 21 लाख रुपये व चारचाकी वाहन, असा एकूण 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे.

फिर्यादी महेश जगन्‍नाथ काटकर (वय 33, रा. अभयचीवाडी, ता. कराड) हा हुपरी येथून रोख 22 लाख रुपये व चांदीचा कच्चा माल घेऊन सेलमकडे (तामिळनाडू) कारने निघाला होता. त्याच्यासोबत तिघेजण होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्‍ती चारचाकीतून (एम.एच. 14 ई 7182) येऊन रेमंड चौक ते लक्ष्मी टेकडीजवळील मंदिराजवळ काटकर यांच्या कारच्या आडवी कार घातली. त्यांनी ‘आपण पोलिस आहे,’ असे सांगून कागदपत्रे पाहण्याचा बहाणा केला. त्यावेळी कारमधील बावीस लाख रुपये घेऊन पोबारा केला, अशी फिर्याद काटकर यांनी कागल पोलिसांत शनिवारी दिली होती.

पोलिसांनी तपासासाठी पथके पाठविली. डीवायएसपी संकेतकुमार गोसावी, पोलिस निरीक्षक अजयकुमार जाधव, एलसीबीचे प्रमुख संजय गोरले, तपास अधिकारी दीपक वाकचौरे, पोलिस उपनिरीक्षक गच्चे हे तपास करत होते. पोलिसांनी फिर्यादी काटकरवर प्रश्‍नांचा भडिमार केला. त्याच्या माहितीतील संभ्रम पाहून पोलिसांना संशय आला. त्याच्या मोबाईलवरून करण्यात आलेले कॉल तसेच कॉल रेकॉर्ड पोलिसांनी तपासले. त्यामध्ये फिर्यादी महेश काटकरच बनावट लुटीचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्‍न झाले. तपासात, आपण व संशयित आरोपी सुशीलकुमार ऊर्फ सनी मुरलीधर भांबुरे (वय 33, रा. दिघंची, ता. आटपाडी) व शिवानंद बोबडे (रा. तासगाव) तिघांनी मिळून लुटीचा बनाव केल्याचे काटकरने पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत पोलिसांनी छडा लावला.

प्रमुख संशयित निलंबित पोलिस

यातील संशयित शिवानंद बोबडे हा सांगलीतील निलंबित पोलिस कर्मचारी आहे. त्याला शुक्रवारीच ड्युटीवर हजर होण्याबाबत ऑर्डर काढण्यात आली होती. हजर होण्यापूर्वीच त्याने हा गुन्हा केला. लुटीच्या वेळी बोबडे यांने पोलिसांचा गणवेश घातलेला होता.
हुपरी, गोकुळ शिरगाव व कागल असे गुन्हा दाखल करण्याचे नाट्य झाले.

…असे अलगद जाळ्यात सापडले

एलसीबीचे प्रमुख संजय गोरले यांनी तपासावेळी फिर्यादी काटकरला एका संशयिताचा फोटो दाखवला. काटकरने ओळखण्यास नकार दिला; मात्र त्याच्या साथीदाराने तो ओळखला. त्यामुळे काटकरवरचा संशय बळावला.

Back to top button