कोल्हापूर : मनपाच्या 7 प्रभागांत बदल | पुढारी

कोल्हापूर : मनपाच्या 7 प्रभागांत बदल

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 115 हरकती दाखल झाल्या होत्या. राज्य निवडणूक आयोगाने त्यापैकी पाच हरकती मान्य करून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे. 31 पैकी सात प्रभागांत बदल झाले आहेत. त्यामुळे त्या प्रभागांतील राजकीय समीकरणे काही प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे.

महापालिकेसाठी पहिल्यांदाच त्रिसदस्य प्रभाग रचना पद्धतीने निवडणूक होत आहे. प्रशासनाने फेब—ुवारीत राज्य निवडणूक आयोगाला प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा सादर केला होता. हरकती व सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर त्याचा अहवाल 4 मार्च रोजी निवडणूक आयोगाला दिला होता. दरम्यानच्या कालावधीत राज्य सरकारने प्रभाग रचनेचे अधिकार स्वतःकडे घेतले होते. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबली होती. सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले. तसेच 10 मार्च 2022 ची स्थिती कायम ठेवली. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला दिलेली प्रभाग रचना ग्राह्य धरण्यात आली आहे.
प्रभाग क्र. 3 मधील लाईन बाजार झूम परिसरातील अष्टेकरनगरातील नागरिकांनी कदमवाडी भागात जाण्यास विरोध केला होता.

त्यांनी भौगोलिक संलग्‍नतेचे कारण दिले होते. त्यामुळे अष्टेकरनगरातील 489 लोकसंख्या प्रभाग क्र. 2 मध्ये घेण्यात आली आहे. प्रभाग क्र. 12 मधील कुंभार गल्‍ली, शाहूपुरी, जयंती नाला व रिलायन्स मॉल परिसर हा तब्बल 3 हजार 219 इतक्या लोकसंख्येचा भाग प्रभाग क्र. 13 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभाग क्र. 20 मधील कैलासगड स्वारी परिसरातील 3 हजार 219 लोकसंख्या प्रभाग क्र. 12 मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. प्रभाग क्र. 14 मधील राजारामपुरी मातंग वसाहत हा 2 हजार 319 लोकसंख्येचा भाग प्रभाग क्र. 13 मध्ये समाविष्ट केला आहे. प्रभाग क्र. 18 मधील मंडलिक वसाहतमधील 139 लोकसंख्येचा भाग प्रभाग 20 मध्ये समाविष्ट केला आहे.
महापालिका प्रशासनाच्या वतीने शनिवारी सकाळी संकेतस्थळावर गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले. त्याबरोबरच ताराबाई पार्कातील महापालिकेचे निवडणूक कार्यालय आणि चारही विभागीय कार्यालयांत अंतिम प्रभाग रचना नागरिकांना पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रभाग रचनेतील बदल असा…

  •  अष्टेकरनगर हा प्रभाग 3 मधून 2 मध्ये
  •  कुंभार गल्‍ली, शाहूपुरी, जयंती नाला, रिलायन्स मॉल परिसर हा प्रभाग 12 मधून 13 मध्ये
  •  कैलासगडची स्वारी परिसर हा प्रभाग 20 मधून 12 मध्ये
  •  राजारामपुरी मातंग वसाहत हा प्रभाग 14 मधून 13 मध्ये
  • मंडलिक वसाहत ईबी 77 हा प्रभाग18 मधून 20 मध्ये

Back to top button