पन्हाळा तालुक्यातील वाघवेत गव्याच्या हल्ल्यात घोडीचा मृत्यू

पन्हाळा तालुक्यातील वाघवेत गव्याच्या हल्ल्यात घोडीचा मृत्यू

वाघवे; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा तालुक्यातील वाघवेत पाणीपुरवठा संस्थेच्या चेंबर परिसरात (मुलांकी नावाच्या शेतात) गव्याने शुक्रवार (दि. १३) रोजी पहाटे धनगरांच्या घोडीवर केलेल्या हल्ल्यात जखमी घोडीचा शेवटी उपचाराविना मृत्यू झाला.

पोलीस पाटील गणेश पोवार, धनगर खाणू पुजारी आणि ग्रामस्थांनी संबधित घटनेची सकाळी ७ वाजल्यापासून पडळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना वारंवार फोनवरुन माहिती दिली. परंतु डॉक्टर घटनास्थळी न आल्याने शेवटी ६ तासाने सोनाली नावच्या जखमी घोडीनं प्राण सोडला. त्यामुळे नागरिकांकडून डॉक्टरांच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

वाघवेच्या डोंगराळ परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून २५-३० गव्यांच्या कळपानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणीही नागरिकांनी केली.

दरम्यान, गुरुवारी रात्री खाणू यशवंत पुजारी (रा.पोर्ले तर्फ ठाणे ) यांनी श्री हनुमान पाणीपुरवठा संस्थेच्या चेंबर परिसरात एका शेतकऱ्याच्या शेतात बकऱ्यांचा तळ बसवला होता. यावेळी इतर पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेजारील मोकळ्या शेतात दोन घोड्यांना बांधले होते. शुक्रवारी सकाळी धनगर खाणू पुजारी घोडी आणायला गेल्यावर एका घोडीवर गव्याने हल्ला केल्याने ती घोडी जखमी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

हेही नक्की वाचा….

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news