पुढारी ऑनलाईन डेस्क
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Microsoft co-founder Bill Gates) यांना कोरोनाची (COVID-19) लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून सौम्य स्वरुपाची लक्षणे जाणवत आहेत. जोपर्यंत मी बरा होत नाही तोपर्यंत आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मी स्वतःला आयसोलेट केले असल्याचे बिल गेट्स यांनी म्हटले आहे.
आपण कोरोनाच्या जागतिक महासाथीच्या सर्वांत धोकादायक टप्प्यात प्रवेश करत आहोत, असा इशारा याआधी बिल गेट्स यांनी दिला होता. कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हॅरिएंटमुळे जगभरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेट्स यांनी हा इशारा दिला होता.
"महामारी अजून संपलेली नसताना आपण वर्तमानातील आपतकालीन परिस्थितीच्या पलिकडे पाहण्यास सुरूवात केलेली आहे. याच अर्थ असा की, आपण केवळ कोरोनावर नियंत्रण मिळवत नाही तर भविष्यात साथींचा रोगांचा उद्रेकच होणार नाही आणि संसर्गजन्य रोगांना लढा देण्यासाठी तयार आहे", असंही बिल गेट्स यांनी एका परिषदेत म्हटले होते.
बिल गेट्स यांनी कोरोना लसनिर्मितीबद्दल याआधी भारताचे कौतुक केले होते. त्याचबरोबर कोरोनाची लस परवडणाऱ्या किमतीत जगातील इतर देशांना दिल्याबद्दल भारतीय उत्पादकांचीदेखील प्रशंसा केली होती.