कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : खोची येथील सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची आज (सोमवार) सुनावणी झाली. यामध्ये न्यायालयाने आरोपी बंडा उर्फ प्रदीप पोवार (वय 30, रा. खोची हातकणंगले) याला न्यायालयाने दोषी ठरवले. या प्रकरणी आराेपीला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली व्ही जोशी यांनी ही शिक्षा सुनावली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वी. वी, जोशी यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. विशेष सरकरी वकिल उमेश्चंद्र यादव पाटील यांनी कामकाज पाहिले. या घटनेच्या निकालाकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या निकालावेळी न्यायालयाबाहेर गर्दी झाली होती.
खोची येथील सहा वर्षीय बालिकेचे ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी भरदिवसा अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याचदिवशी तिचा मृतदेह आढळून आला होता. सदर बालिकेचे प्रथम अपहरण, बलात्कार करून खून केल्याचे स्पष्ट झाले होते.
मुलगी अंगणवाडीत शिकत होती
रविवारी मुलगीची आई रोजंदारीसाठी दुसर्याच्या शेतात गेली होती. परत आल्यानंतर मुलीचा जेवणाचा डबा तसाच असलेला तिला आढळला. ती न जेवता कुठे गेली, असा प्रश्न त्यांना पडला. दुपारी एक वाजल्यापासून त्यांनी तिला शोधायला सुरुवात केली. कुटुंबीयांसह गल्लीतल्या तरुणांनीही सर्वत्र शोधाशोध केली.
घराशेजारी राहणार्या प्रदीप पोवारसोबत तिला मशिदीकडे जाणार्या रस्त्यावर पाहिल्याचे काहींनी सांगितले. त्यानुसार युवकांच्या गटाने मशिदीजवळच्या दफनभूमी परिसरात शोधायला सुरुवात केली. या ठिकाणी एका झुडपाखाली तिचा मृतदेह सापडला. पोटच्या पोरीचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी आक्रोश केला. उपस्थितांचे डोळेही पाणावले. तिच्या अंगावर जखमेच्या खुणा होत्या. तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. बलात्कार करून खून झाल्या प्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.