मुंबई; पुढारी ऑनलाईन : मशिदीच्या भोंग्यावरून राज्यात सुरु असलेल्या वादावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील कायदा आणि सुस्थितीचा आढावा घेण्यात आला.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा काहींकडून प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. भोग्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल २००५ मधील असून त्यानंतर २०१७ मध्ये राज्य सरकारकडून जीआर काढण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सांगण्यात आल्याचे गृहमंत्री म्हणाले. त्याचबरोबर भोंग्यावर नियमावली ठरवण्यासाठी विरोधी पक्षांशी तसेच संघटनांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला राज ठाकरे यांनाही निमंत्रित केलं जाणार असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे मनसेनं मशिदीत सीसीटीव्ही लावण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सीसीटीव्ही लावण्यास सरकारचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. स्वेच्छेने सीसीटीव्ही लावले जाऊ शकतात, असे ते म्हणाले.