हिंदुत्ववादी जनतेने शिवसेनेला नाकारले ! कोल्हापूर उत्तरमधील पराभवानंतर भाजपचा हल्लाबोल | पुढारी

हिंदुत्ववादी जनतेने शिवसेनेला नाकारले ! कोल्हापूर उत्तरमधील पराभवानंतर भाजपचा हल्लाबोल

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या, महाविकास आघाडी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस हेच कोल्हापूरचे ‘उत्तर’ ठरले. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव 19 हजार 307 मताधिक्याने विजयी झाल्या. या विजयात सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडली ती पालकमंत्री सतेज पाटील यांनी. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या निवडणुकीत आघाडीने आपली जागा कायम राखत प्रतिस्पर्धी भाजपला चोख ‘उत्तर’ दिले.

काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकली, पण शिवसेना हरली : भाजप

दरम्यान, या पराभवानंतर महाराष्ट्र भाजपने पोस्ट करत म्हटले आहे की, कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांचा विजय झाला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! महाविका आघाडीचे तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशी लढला, तरी जवळपास ७७ हजार मते मिळवली. परंतु मतांचे गणित पाहायला गेल्यास २०१४ मध्ये शिवसेनेला ६९ हजार आणि २०१९ मध्ये शिवसेना-भाजपला मिळून ७५ हजार मते पडली.

२०१४ मध्ये काँग्रेसला ४७ हजार, राष्ट्रवादीला १० हजार मते पडली, तर २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून ९१ हजार मते मिळाली. मग कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडल्याचं उघडपणे दिसत आहे. शिवसेनेची हक्काची ४० ते ६० हजार मतदान असताना तिन्ही पक्षांची मिळून ९६ हजार मते आहेत, तर भाजपची एकट्याची ७७ हजार मते आहेत. याचा अर्थ शिवसेनेच्या मतांमध्ये केवळ फूट नाही तर हिंदुत्ववादी जनतेने शिवसेनेला नाकारलं आहे. आणि हो, या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा ईव्हीएमवरील विश्वास वाढेल ही अपेक्षा आहे.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी मंगळवारी 61.19 टक्के मतदान झाले होते. जयश्री जाधव यांनी 2015 ते 2020 या कालावधीत भाजपकडून सम्राटनगर प्रभागातून महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे.

शनिवारी राजाराम तलावाशेजारी असलेल्या जलसंपदा विभागाच्या गोदामात मतमोजणी झाली. सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. दुपारी दोन वाजेपर्यंत मतमोजणी संपली. मात्र दोन मतदान केंद्रांवरील ईव्हीएम सुरू होत नसल्याने त्या मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशिनमधील चिठ्ठ्या मोजण्यात आल्या. यानंतर दुपारी चार वाजता निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी निकाल घोषित केला.

हे ही वाचलं का ?

Back to top button