मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : हनुमान जयंतीनिमित्त शनिवारी शिवसेनेने दादरमध्ये महाआरतीचे आयोजन करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. दादर पश्चिम येथील पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिर (गोल मंदिर) येथे शिवसेना विभाग क्रमांक 10 च्या वतीने या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या हनुमान मंदिराच्या समोरच मस्जिद आहे. त्यामुळे खुद्द शिवसैनिकांनीही ही महाआरती करताना विशेष खबरदारी घेतल्याचे दिसले. भगव्या टोप्या, भगव्या पताका, भगवे झेंडे आणि काही महिलांनी परिधान केलेल्या भगव्या साड्या यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. शिवसेना नेते दिवाकर रावते, आमदार सदा सरवणकर, यांच्यासह शेकडो शिवसैनिक या महाआरतीत सहभागी झाले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे राज्यात सध्या हनुमान चालिसा विरुद्ध भोंगा असा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी या वादाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मनसेकडून अनेक शहरांत हनुमान चालिसा पठण करण्यात आले, तर राष्ट्रवादीकडून आरती आणि इफ्तार पार्टी अशा सर्वधर्मसमभाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनसेच्या चालिसाला उत्तर म्हणून शिवसेनेच्या या महाआरतीकडे पाहिले जात आहे.
भोंगे काढण्या प्रश्नच नाही : गृहमंत्री
मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मशिदींवर लागलेले अजानसाठीचे भोंगे काढण्याची शक्यता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शनिवारी फेटाळून लावली.
शिवाजी पार्क आणि ठाणे येथे झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला 3 मेची डेडलाईन दिली आहे. भोंगे न उतरविल्यास मनसैनिक अजानचा आवाज येत असलेल्या मशिदींसमोर किंवा पसिरातील मंदिरावर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावतील, असा इशारा त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर राज्यभर तणावाची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे असून, शनिवारी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेनेनेही महाआरतीची हाक दिली.
सरकारने मशिदीवरील भोंगे न उतरविल्यास मनसे रस्त्यावर उतरेल आणि सामाजिक वातावरण तणावपूर्ण होईल ही शक्यता लक्षात घेऊन वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. या बैठकीत उभयतांमध्ये कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्र्यांनी राज यांचा इशारा मात्र बेदखल केला. वळसे पाटील म्हणाले, न्यायालयाने आपल्या निर्णयात मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत कुठेच निर्देश दिलेले नाहीत. न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पीकरला बंदी घातली आहे, पण भोंगे उतरवण्याबाबत काहीही म्हटलेले नाही. त्यामुळे भोंगे काढण्याचा प्रश्नच नाही, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.