कोल्हापूर : अण्णांच्या माघारी कोल्हापूरची जनता त्यांचे स्वप्न पूर्ण करेल, जयश्री जाधव झाल्या भावूक | पुढारी

कोल्हापूर : अण्णांच्या माघारी कोल्हापूरची जनता त्यांचे स्वप्न पूर्ण करेल, जयश्री जाधव झाल्या भावूक

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन  : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, विजय निश्चित आहे. अण्णा नाहीत याची मला खंत आहे. त्यांची मला पावलोपावली आठवण येईल. अण्णांच्या माघारी कोल्हापूर जनतेने त्यांचे स्वप्न पूर्ण केले. अण्णांनी जे पेरलं ते चांगलं उगवलं. असे सांगत जयश्री जाधव भावुक झाल्या.

कोेल्हापुरच्या स्वाभिमानी जनतेने करुन दाखवले. त्यांनी मला पाठिंबा दिला. अण्णांची आठवण पदोपदी येते. त्यांनी जे कार्य केले, त्यांनी जी माणसे जोडली ती आजही माझ्याबरोबर आहेत. अण्णां नाहीत याची मला खंत आहे. अण्णांचे स्वप्न मी निश्चित पूर्ण करेन, असेही त्या म्हणाल्या.

मला जनतेने जी मते दिली त्यांची मी आभारी आहे. या यशाचे  श्रेय मी महाविकास आघाडीली देते. पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझ्या जनतेलाही श्रेय देईन. कोल्हापुरच्या स्वाभिमान जनतेने मला न्याय दिला आहे. या निवडणुकीत  भाजपचे संस्कार कमी पडलेत, असेही त्यांनी नमूद केले.

कोल्हापूरचा ‘उत्तरा’धिकारी कोण याचा फैसला आज (दि.१६) शनिवारी दुपारी १२ पर्यंत होणार आहे. राजाराम तलावाशेजारील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार्‍या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यात चुरस आहे. १५ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे, त्यानंतरच्या पुढच्या दोन-अडीच तासांतच निवडणुकीचा नेमका कल स्पष्ट होईल. दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यातून आरोप-प्रत्यारोप आणि त्यामुळे टोकाला गेलेली ईर्ष्या यातून निवडणुकीत चुरस निर्माण झाली. मात्र ती चुरस मतदानात फारशी दिसली नाही. पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (दि. १२) ६१.१९ टक्के मतदान झाले.

Back to top button