हसन मुश्रीफांचा रामनवमीला जन्म झाल्याचा दावा खोटा, समरजितसिंह घाटगे यांचा हल्लाबोल | पुढारी

हसन मुश्रीफांचा रामनवमीला जन्म झाल्याचा दावा खोटा, समरजितसिंह घाटगे यांचा हल्लाबोल

कागल (जि. कोल्हापूर) : पुढारी ऑनलाईन

कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या पोस्टर्सवरून वादंग निर्माण झालाय. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीमध्ये श्री रामाचा एकेरी उल्लेख केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज शुक्रवारी कागलमध्ये भव्य मोर्चा काढला. पण मुश्रीफ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून देण्यास नकार दिल्याचा दावा समरजितसिंह घाटगे यांनी केला. मुश्रीफांचा रामनवमीला जन्म झाल्याचा दावा खोटा असल्याचे सांगत तसे पुरावे समरजितसिंह यांनी माध्यमांसमोर सादर केले. मुश्रीफांनी कशा पध्दतीने जनतेची ४० वर्षे फसवणूक केली, याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यांचे नाव रामनामाशी जोडल्यामुळे भाजपने त्यांच्यावरून कडकडून टीका केली. दरम्यान, समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफांचा जन्म रामनवमी नव्हे तर रंगपंचमीला झाल्याचे पुरावे सादर करत सांगितले. ते हे पुरावे घेऊन पोलिसांत गेले असता पोलिसांना चौकशी करण्यासाठी वेळ मागत तक्रार घेण्यास नकार दिल्याचे ते म्हणाले.

समरजितसिंह घाटगे म्हणाले, रामनवमीला मुश्रीफांचा जन्म झाल्याची माहिती खोटी आहे. मुश्रीफांनी जनतेला खोटी माहिती दिली. २४ मार्चला १९५४ ला रामनवमी नव्हती. ११ एप्रिल, १९५४ मध्ये मुश्रीफांचा जन्म झाला आहे. खोटं बोलून ४० वर्षे जनतेची त्यांनी फसवणूक केलीय. श्रीरामांची थट्टा बहुजन समाज खपवून घेणार नाही.

मुश्रीफ यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी समरजितसिंह घाटगे समर्थकांसह दाखल झाले होते. यानंतर पोलिसांनी हा मोर्चा पोलिस आवारामध्ये अडविला आहे. तर मुश्रीफ यांनी ते स्टंटबाजी करत असल्याचा आरोप केला आहे.

रामनवमी हा आपला वाढदिवस आहे, हा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा संशोधनाचा विषय आहे. मात्र, यानिमित्ताने त्यांच्या जाहिरातीत हसन मुश्रीफ यांच्या नावातील अद्याक्षरे घेऊन राम असा बहुजन समाजाचे नायक प्रभू रामचंद्र यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी जाहीर केले होते. शुक्रवार, दि. 15 रोजी कागल येथे मिरवणूक काढून हा गुन्हा दाखल करण्यासाठी घाटगे हे कागल पोलिस स्थानकात गेले होते.

Back to top button