कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : अंबाई टँक परिसरात झालेल्या बेछूट गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित मानसिंग विजय बोंद्रे (वय ३०, रा. अंबाई टँक, कोल्हापूर) याला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. १२ डिसेंबर, २०२१ रोजीच्या मध्यरात्री गोळीबाराचा थरार घडला होता. जुना राजवाडा पोलिसांनी मानसिंग बोंद्रे याच्यासह चौघांविरुद गुन्हा दाखल केला होता.
मुख्य संशयित मानसिंग बोंद्रेसह साथिदारांना पोलिसांनी अटक केले होते. मानसिंग याने अटकेची कारवाई टाळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पंधरवड्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली होती.
मानसिंग बोंद्रे यांच्यावतीने ॲडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला होता. त्यावर आज सकाळी न्यायमूर्तींनी निकाल देऊन मानसिंग बोंद्रे यांचा जामीन अर्ज मंजूर केला. दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि मालमत्तेच्या कारणातून हा प्रकार घडला होता.
सावत्र भाऊ अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे (वय ३०, रा. अंबाई टँक, कोल्हापूर) यांनी याप्रकरणी मानसिंग बोंद्रे याच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
आपणासह वृद्ध मातेला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मानसिंग बोंद्रे याने घराच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केल्याचे म्हटले होते. या घटनेमुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती.