मुदाळतिट्टा : वारकर्‍यांच्या मांदियाळीत रंगला ग्रंथदिंडी सोहळा! | पुढारी

मुदाळतिट्टा : वारकर्‍यांच्या मांदियाळीत रंगला ग्रंथदिंडी सोहळा!

मुदाळतिट्टा : पुढारी वृत्तसेवा
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष करत हाती टाळ-मृदंग व पताका घेऊन विठ्ठल भक्‍तीत तल्लीन होत आदमापूर (ता. भुदरगड) येथे सोमवारी पहिल्या विश्‍वात्मक संत साहित्य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथ दिंडी सोहळ्याने झाला.पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकारद्वारा प्रायोजित पहिल्या विश्‍वात्मक संत साहित्य संमेलनातील ज्ञानेश्‍वरी व तुकाराम गाथा ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. दिंडी सोहळ्यास हजारो वारकरी सहभागी झाले होते.

प्रारंभी संत बाळूमामा यांच्या समाधीचे दर्शन व पूजन ह. भ. प. न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी यांच्या हस्ते, बाळूमामा देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांच्या हस्ते झाले. मरगुबाई मंदिर येथून ज्ञानेश्‍वरी व तुकाराम गाथा अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली. हनुमान मंदिर, सरकार वाडामार्गे ग्रंथदिंडी बाळूमामा मंदिरात आली. ग्रंथदिंडीत हजारो वारकरी बांधव, भगिनी सहभागी झाले होते. यामुळे आदमापुरात पंढरी अवतरल्या चित्र पाहावयास मिळत होते. मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थ स्वागत करत होते. महिला औक्षण करत होत्या. वारकरी बांधव ‘ज्ञानोबा माऊली’चा जयघोष करत टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका धरत तल्लीन होऊन गेले होते.

बाळूमामा मंदिर येथे ग्रंथदिंडी आल्यानंतर संमेलनाचे उद्घाटन ह.भ.प. न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी डॉ. प्रकाश खांडगे, विशाल जेधवे, निपुण सिंघवी, प्रताप अंकोलेकर, रामचंद्र देखणे, सबिताई गोसावी, सुमेधा शेवदे, विद्याधर शेवदे आदींसह वारकरी बांधव उपस्थित होते. ह.भ.प. मदन महाराज गोसावी म्हणाले, आदमापुरात कार्यक्रम व्हावा ही आमची भावना होती; पण कोरोनामुळे हा कार्यक्रम घेण्यास थोडा विलंब झाला. आदमापूर नगरी ही बाळूमामांच्या पद्स्पर्शाने पावन झाली आहे. बाळूमामा थोर संत-महात्मे होऊन गेले आहेत. आपल्यावर संतांचे उपकार आहेत. एकमेकांना मदत करणे यातच खरे सुख सामावले आहे आणि ही सर्व शिकवण आपल्याला संत साहित्यातून मिळते. आदमापूरसारख्या गावातून अशा साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचा अभिमान सर्वांना आहे.
दीपप्रज्वलनानंतर संत साहित्यिक ह.भ.प. रामचंद्र देखणे महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. सरवडे, आदमापूर, उंदरवाडी, कोनवडे, कूर, सुळंबी, मडिलगे, कासारपुतळे, कासारवाडा, अंतुर्ली, निगवे, अर्जुनवाडा, कोळवण, तिटवे गावांतील वारकरी बांधव उपस्थित होते.

Back to top button