कागल ; पुढारी वृत्तसेवा : पाच कोटींच्या आमिषाने 37 लाख रुपयांची फेसबुकद्वारे ऑनलाईन फसवणूक झाल्याची फिर्याद कागल शहरातील शाहू वसाहत येथील सतीश सखाराम निकम (वय 42) यांनी कागल पोलिसांत दिली आहे. युनायटेड किंगडम येथील युसूफ साकिब फ्रँक जॅक्सन याने आपली ऑनलाईन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहा जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
शाहू वसाहत येथील सतीश सखाराम निकम यांना जॅक्सन याने फेसबुक मेसेंजरवर संदेश पाठवून ओळख करून घेतली. त्यानंतर युनायटेड किंगडम येथील भरत निकम नावाच्या रहिवाशाचे
2014 साली निधन झाले आहे. भरत निकम यांची युनायटेड किंगडम येथील बर्कलेज बँकेत पाच कोटींची ठेव असून, त्यांच्या वारसांचा बँक शोध घेत आहे, असे सांगितले.
तसेच बर्कलेज बँकेचा ई-मेल आयडी फिर्यादी सतीश निकम यांना दिला व भरत निकम यांच्या नावाची बनावट कागदपत्रे तयार करून आपण (सतीश निकम) भरत निकम यांचे वारस असल्याचे संबंधित ई-मेलवर संपर्क करून सादर करण्यास सांगितले
फिर्यादी निकम यांचा विश्वास संपादन करण्यासाठी संशयित जॅक्सन याने बर्कलेज बँकेचे एटीएम कुरिअरने पाठवून फिर्यादी सतीश निकम यांना खात्यात रक्कम जमा झाल्यावर पैसे काढण्यास सांगितले.
त्यानंतर एटीएम अॅक्टिवेशन चार्जेस, इन्श्युरन्स पॉलिसी कव्हरसाठी म्हणून युनायटेड नेशन ऑफ इंडियाची फी व इंटरनॅशनल मॉड्रेटरी फंडची फी, असे मिळून फिर्यादी निकम यांच्याकडून 36 लाख 55 हजार रुपये उकळले.
त्यानंतर पुन्हा कुरिअरने बँकेच्या बनावट लेडरहेडवरील पत्र पाठवून एक कोटी फंड सिक्युरिटी फीसाठी पाठवण्यास फिर्यादी निकम यांना सांगितले. त्यामुळे फिर्यादी निकम यांना संशय आला.
पाच कोटी मिळत नाहीत आणि वर आपल्याकडेच पैशांची मागणी होत असल्याने त्यांनी गुरुवारी कागल पोलिसांत फसवणुकीची फिर्याद दाखल केली. याप्रकरणी कागल पोलिस अधिक तपास करत आहेत.