काेल्‍हापूर : दानोळीत विजेच्‍या धक्‍क्‍याने युवकाचा मृत्यू | पुढारी

काेल्‍हापूर : दानोळीत विजेच्‍या धक्‍क्‍याने युवकाचा मृत्यू

दानोळी, पुढारी वृत्तसेवा : शेती पंपाच्या मोटर पेटीत करंट उतरल्याने विजेचा धक्‍का बसून नांद्रे येथील विशाल पाटील या युवकाचा मृत्यू झाला. यावेळी महावितरणच्या या अनागोंदी कारभाराचा पाढा विद्युत निरीक्षकांच्या समोर ग्रामस्थांनी मांडल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. दरम्यान, पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याने पुढील अनर्थ टळला.

…त्याचदिवशी शिवसेनेचे हिंदुत्व फिके पडले : रावसाहेब दानवे

नांद्रे माळ्यातील विशाल चवगोंडा पाटील (वय २०) हा युवक सकाळी साडेआठ वाजता शेतातील बोअरची मोटर सुरु करण्यासाठी गेला होता. त्याने मोटर पेटीच्या हँडलला हात लावला आणि तो तेथेच चिकटला. ही बाब लक्षात येताच शेजारील शेतकऱ्यांनी काठीच्या सहायाने त्याला बाजूला केले.  रुग्णालयात नेले असता त्‍याचा उपचारापूर्वीच  मृत्‍यू झाल्‍याचे घोषित करण्यात आले. विद्युत निरीक्षक जयश्री पाटील यांनी पाहणी केली असता सर्व्हिस वायर मधून पेटीत करंट उतरल्याचे लक्षात आले. दरम्यान, जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

हिंगोली : हळद शिजवणाऱ्या कुकरच्या स्फोटात चार जण जखमी ; एक गंभीर

एकुलता एक असलेल्या विशालच्या पश्चात आई, वडील, दोन विवाहित बहिणी आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल ग्रामस्थांतून खदखद व्यक्त होत होती. घटनेनंतर अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस पाटील प्रशांत नेजकर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थितांना अश्रू अनावर

विशाल पाटील यांच्या बोअरच्या पाण्यावर जिल्ह्यातील पहिली मोठी देवराई तयार झाली आहे. नांद्रे कुटुंबीय आणि त्यांचा मुलगा विशाल पाटील यांचा या देवराईत मोठा सहभाग राहिला आहे. याबद्दल विजय दळवी यांनी जयश्री पाटील यांना माहिती दिली. तेव्हा सर्वच उपस्थितांचे डोळे पाणावले.

तर शॉक लागलाच नसता.

मोटर पेटीपासूनच्या दोन खांबांच्या आधीच्या खांबावर न्यूट्रल केबल चार माहिण्यापूर्वी तुटली आहे. तेव्हा ती जोडण्यासाठी आलेल्या दोन कर्मचाऱ्यात खांबावर कोण चढणार, सिनियर कोण ? यावर अर्धा तास वाद झाला होता. शेवटी केबल जोडलीच नाही आणि त्या खांबालाच केबल गुंडाळून कर्मचारी निघून गेले. ती केबल जोडली असती, तर हा अपघात झाला नसता, असे उपस्थितीत म्हणत होते. विशेष म्हणजे एका कर्मचाऱ्याने नवीन कनेक्शन देतो, म्हणून या भागातील अनेकांकडून १५ ते २० हजार रुपये लाटल्याचेही सांगण्यात आले.

 

हेही वाचलं का? 

पहा व्हिडिओ : ‘झुंड’ मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

Back to top button