कोल्हापूर : शिवसेनेच्या उपस्थितीत ठरणार महाविकास आघाडीचा उमेदवार?

कोल्हापूर : शिवसेनेच्या उपस्थितीत ठरणार महाविकास आघाडीचा उमेदवार?
Published on
Updated on

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. काँग्रेसकडून कै. चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू असली, तरी काही नावे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, ही निवडणूक महाविकास आघाडीच्या वतीने लढविण्याचे जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील सहभागी असणार्‍या सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांची बैठक घेण्याबाबत शहरात हालचाली सुरू आहेत.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आ. चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे. जाधव यांच्या निधनानंतर पोट निवडणुकीची चर्चा सुरु झाली तेव्हा जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.

पूर्वीचा कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघ म्हणजे सध्याचा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आतापर्यंत या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. परंतु, 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना या मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते.

विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजपने शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिल्याने शिवसेनेने भाजपसोबत राहण्यास नकार दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेची युती तुटली. त्यामुळे निर्माण झालेल्या विचित्र स्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली.

महाविकास आघाडी आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात त्याच सूत्राने राजकारण सुरू झाले. महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच शिवसेनेला सोबत घेतले होते. जिल्हा परिषदेच्या राजकारणातही दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेत त्यांना सन्मानजनक पदे दिली आहेत.

यानंतर ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या गोकुळच्या निवडणुकीतदेखील दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेत निवडणूक लढवत गेल्या अनेक वर्षांतील महाडिक यांची सत्ता संपुष्टात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मात्र दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना यांचे जमले नाही. दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला गृहित धरण्याचा प्रयत्न केला; परंतु शिवसेनेने स्वतंत्र पॅनेल करत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना चांगलाच धक्का दिला.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूकदेखील महाविकास आघाडीच्या वतीने लढली जावी, अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांची आहे. परंतु, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे शिवसेनेकडून इच्छुक आहेत; परंतु पक्षाच्या आदेशापुढे ते नाहीत. भाजपने तर आपली यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा एकत्र मेळावा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. या मेळाव्यातच उमेदवाराच्या नावावर चर्चा होऊन त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news