संस्थानकालीन कोल्‍हापूरची पाण्याची तहान भागविणाऱ्या पाण्याच्या खजिन्याची स्‍वच्छता | पुढारी

संस्थानकालीन कोल्‍हापूरची पाण्याची तहान भागविणाऱ्या पाण्याच्या खजिन्याची स्‍वच्छता

कोल्‍हापूर ; पुढारी वृत्‍तसेवा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षाच्या निमित्ताने दर रविवारी एका शाहूकालीन वास्तूची स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात येते. संस्थानकालीन पाणीपुरवठा योजना असणाऱ्या आणि तत्कालीन 20 ते 25 हजार लोकसंख्या असणाऱ्या तटबंदीच्या आतील कोल्हापूरची पाण्याची तहान भागविणाऱ्या पाण्याच्या खजिन्याची स्वच्छता मोहीम घेण्यात आली. महापालिकेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात पाण्याच्या खजिन्याची टाकी, आसपासचा परिसर आणि शेजारील टाक्या धुवून स्वच्छ करण्यात आल्या. पाणी सोडण्यात येणाऱ्या सर्व जुन्या पाईपलाईनसुद्धा यावेळी धुवून चकाचक करण्यात आल्या.

यावेळी परिसरातील कचरा गोळा करून कचरागाडीत टाकण्यात आला. टाकीच्या सर्वबाजूंनी वाढलेले गवत व टाकीवर वाढलेले गवत कापून टाकीला टँकरद्वारे पाण्याने स्वच्छ धुण्यात आले. नैसर्गिक उताराच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या खजिन्यातून सध्या फक्त शिवाजीपेठ आणि मंगळवार पेठेला पाणीपुरवठा होत असला तरी 145 वर्षे होऊनसुद्धा ही योजना अजूनही व्यवस्थित सुरु आहे. महापालिका प्रशासनाने परवानगी दिल्यास टाकीच्या बाजूने पडलेले नक्षीचे तुकडे पुन्हा जोडून रंगरंगोटीसुद्धा जनसंघर्ष सेनेकडून करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी, सुनील थोरवत, संकेत कोळी,स्वरूप जगदाळे, सुनील राठोड, राकेश देसाई, प्रथमेश मुळीक, मयुरेश कारंडे, मनोज पाटील, सुभाष पाटील, आदित्य कोळी आदी उपस्थित होते.

Back to top button