कोल्हापूर विमानतळाचे नामकरण ‘राजाराम महाराज’ असेच होणार | पुढारी

कोल्हापूर विमानतळाचे नामकरण ‘राजाराम महाराज’ असेच होणार

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव राज्याने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयास सादर केला आहे. यानुसार विमानतळाचे नामकरण हे ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ असेच होणार असल्याची माहिती शुक्रवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली.

शहरातील संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित केंद्रीय अर्थसंकल्पावरील द़ृष्टिक्षेप या कार्यक्रमानंतर डॉ. कराड यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, देशातील 13 विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव आले आहेत. ते प्रस्ताव या मंत्रालयाने प्रधानमंत्री कार्यालयास सादर केले आहेत. देशात आणखी काही विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव आहेत का, अशी विचारणा पुन्हा पीएम कार्यालयाने केली आहे. त्यामुळे अजूनही या प्रस्तावांबाबत राज्यांकडे विचारणा केली जात आहे.

महाराष्ट्रातून ज्या तीन विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव आले आहेत. यामध्ये औरंगाबाद, कोल्हापूर आणि शिर्डी या तीन प्रस्तावांचा समावेश आहे. कोल्हापूरच्या विमानतळाला ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’, औरंगाबादेतील चिकलठाण्याचे ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ आणि शिर्डीतील साईबाबा यांच्या नावाने विमानतळाचे नामकरणाचे प्रस्ताव आहेत. या प्रस्तावांवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, गेली काही वर्षे प्रयत्न करून विमानतळ प्राधिकरण, राज्य सरकार, हवाई वाहतूक मंत्री यांच्यामार्फत छत्रपती राजाराम महाराज यांचे कोल्हापूर विमानतळाला देण्याच्या मागणीला यश मिळविले आहे. यानुसार कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचेच नाव द्यावे लागेल, असे पत्रक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिले आहे.

महालक्ष्मी नाव चुकून घेतले!

कोल्हापूर विमानतळाबाबत राज्याने छत्रपती राजाराम महाराज यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला आहे अन् आपण महालक्ष्मी असे नामकरण होणार म्हणून सांगत आहात, तेव्हा नावात काही बदल झाला काय, अशी विचारणा डॉ. कराड यांना केली असता. ते म्हणाले की, जो प्रस्ताव राज्य सरकारने पंतप्रधान कार्यालयास दिला आहे, त्यानुसारच नामकरण होणार आहे. महालक्ष्मी नावाचा चुकून उच्चार झाला असावा, हे नामकरण ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ असेच होणार आहे, असेही डॉ. कराड यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

Back to top button