छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्योगनीती | पुढारी

छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्योगनीती

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आर्थिक सुबत्तेसाठी शेतीमधील तंत्रज्ञान विकसित केले. शेतकर्‍यांची पिळवणूक न करता कर वसूल करावा, असे सक्त आदेश महाराजांनी दिले होते. उभ्या पिकांचा नाश करणार्‍या मुलूखगिरीचा बिमोड करून मोहिमांच्या, युद्धाच्या काळात होणारी पिकांची नासाडी हा शिवशाहीमध्ये कायदेशीर गुन्हा होता. एकाच नागरिकाला दोन व्यवसायाला जोडून त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेणे ही श्रमशक्ती छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वीच अवलंबली होती. यालाच आज Maximum Utillisation of Man Power म्हणून उद्योग क्षेत्रात संबोधले जाते.

राज्याभिषेक प्रसंगी ब्रिटिश कंपनीचा वकील हेन्री ऑस्किडन याचा ‘नजराणा’ स्वीकारताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला सक्त राजाज्ञा केली होती की, ‘तुमची गलबते स्वराज्याच्या किनार्‍यापासून चाळीस सागरी मैल’ बाहेरूनच मुशाफिरी करतील व एत्तदेशीय व्यापारी नौका व मच्छिमारांना नुकसान करणार नाहीत, याची खबरदारी घ्या. हा प्रसंग आहे 6 जून 1674 मधील रायगडावरचा. ही राजाज्ञा म्हणजे आधुनिक सागरी आर्थिक क्षेत्र निर्बंध कायदा होय. शिवाजी महाराजांनी सागराचे सामरिक व आर्थिक स्वरूप ओळखून आरमाराची उभारणी केली. 1659 मध्ये मराठ्यांच्या जंगी बेड्यात फक्त 28 गलबते होती. परंतु, 1674 मध्ये म्हणजे राज्यभिषेकप्रसंगी हीच संख्या 74 इतकी झाली. पोर्तुगीज गोव्याच्या अंमलदाराने सालाझारला लिहिलेल्या गुप्त खलित्यात ही माहिती कळवली होती. ती चिटणिसांच्या बखरीशी मिळती जुळती आहे.

जहाज बांधणी उद्योगात कोळी, आगरी, भंडारी अशा समूहाला गुंतवले होते. महाराजांनी फतवा काढला होता की, गोर्‍या टोपीकरांकडून जहाज बांधणी कला आत्मसात करून त्यात देशी बांधणीचा मिलाफ करा. याचाच अर्थ सेवायोजन होऊन आरमाराचे सामर्थ्य द्विगुणीत होईल. कुलाबा (रायगड) येथे शिवशाहीत जहाज बांधणीचा कारखाना कार्यरत होता. कुलाबा (कुल+अब) या शब्दाचा अर्थच मुळी गोदी होय. या गोदीत शिरब, पाल, गलबत ही अर्वाचीन काळातील विनाशिका जातीची जहाजे तयार होत. कोकणातल्या काही जलदुर्गाच्या आसपास भुयारे होती. या ठिकाणी युद्धात किरकोळ जायबंदी झालेल्या नौकांना डागडुजी करून मोहिमेवर परत पाठवत असत. याच तरत्या तराफ्याला ‘फ्लोटिंग डॉक’ म्हणतात. शिवशाहीत तंत्रज्ञान किती विकसित होते, हे त्यावरून समजते. या जलदुर्गांवर टनापेक्षा जड वजन असणार्‍या बुलंद तोफा तांडेलांनी कशा चढवल्या, हे एक कोडेच आहे. तोफा गाळण्याचा व दारुगोळानिर्मितीचा कारखाना मराठ्यांनी मावळ प्रांतात उभारला होता.

रायगड राजधानीची मांडणी करताना पेशवे व चिटणिसांनी प्रथम बाजाराची जागा मुक्रर करून व्यापार – उदिमासाठी बारा बलुतेदारांची सोय करून शिबंदीचा प्रश्न सोडवला. त्यालाच आजच्या भाषेत Line of supply and logistic support म्हणतात. प्रजाजनांना उत्तमोत्तम वस्तू उपलब्ध व्हाव्यात हा यामागचा उद्देश. लोहार, सुतार, पाथरवट यांच्या उत्पन्नाची सोय करत त्यांना शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सेवेत जोडले. यालाच मानव संसाधन व व्यक्तीसापेक्ष उद्योगनीती म्हणतात. शिवशाहीने हा यशस्वी प्रयोग तिनशे वर्षांपूर्वी या मातीत रुजवला. शस्त्रसामग्री व दारुगोळानिर्मिती असे विभाग उभे करून महाराजांनी उत्पन्न व रोजगाराची नवीन दालने रयतेसाठी सुरू करून सामर्थ्य व अर्थ याची सांगड घातली. जाणीवपूर्वक या विभागात त्यांनी मागास जमाती व मुस्लिमांना जोडले होते. आरमारात दौलतखान हे गोलंदाज अधिकारी व इब्राहिम हे दिशादर्शक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्लेदार व गडकरी यांना काही सुरक्षा सूचना आज्ञा पत्रातून दिल्या आहेत. त्याला आधुनिक भाषेत औद्योगिक सुरक्षा पालन असे संबोधतात. महाराज लिहितात, गडकरी हो सावध चित्ताने वर्तणूक ठेवून दुर्गाची निगराणी व निगा ठेवणे. अंधार्‍या रात्री गडाचे आगळ, कडी, कोयंडे, शिस्तीत लावणे. गाफील न राहणे, अन्नधान्य कोठारात कापशी तेलबत्तीचा वापर होत असल्यास गस्त वाढवा अन्यथा मूषक, घूस तेलाच्या आमिषाने वात पळवताना कोठारातील धान्याला आग लागून स्वराज्याच्या संपत्तीचे नुकसान होईल. या बेपरवाईचा मुलाहिजा ठेवणार नाही. कसूर कुचराईला दंड होईल. सर्वांनी हे समजून उमजून गडांचे रक्षण व्हावे. अशा या प्राजाहितदक्ष रयतेच्या राजाला नम्र अभिवादन!

  • कर्नल विनायक अभ्यंकर

Back to top button