पर्यटन विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यास ३१ कोटींचा निधी मंजूर : राजेश क्षीरसागर

पर्यटन विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यास ३१ कोटींचा निधी मंजूर :  राजेश क्षीरसागर
Published on
Updated on

कोल्हापूर: पुढारी ऑनलाईन: कोल्हापूर जिल्हा पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास येत आहे. दररोज हजारो पर्यटक कोल्हापूरला भेट देत असतात. त्यामुळे पर्यटकांना कोल्हापूरची ऐतिहासिक माहिती व्हावी, पुरातन वास्तूंचे संवर्धन व्हावे, यासाठी विविध कामासाठी निधी मिळावा म्हणून राज्याच्या पर्यटन विभागाकडे पाठपुरावा केला जात असून, त्यास यश मिळत आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्हावासीयांना नववर्षाची अनोखी भेट दिली असून, पर्यटन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटन वृद्धीसाठी ३१ कोटी ३१ लाख इतका निधी मंजूर केला आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी  प्रसिद्धीपत्रक व्‍दारे दिली आहे.

या  निधीमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासास चालना मिळणार आहे. पर्यटन विभागाकडून मंजूर निधीबद्दल करवीरवासीयांच्या वतीने शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. त्यामुळे लवकरच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा जाहीर सत्कार करणार असल्याचेही पत्रकात नमूद केले आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने सुजलाम-सुफलाम असलेल्या जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने सुविधांचा वाणवा जाणवत होता. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरासह जिल्ह्यातील विविध धार्मिक क्षेत्रे, गडकिल्ले, तलाव, अभयारण्य आदींना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. या पर्यटकांना मुलभूत सोयी सुविधा देणे, पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता नवनवीन संकल्पना राबविणे यासाठी शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे.

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही सकारात्मक भूमिका घेत पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२१-२२ अंतर्गत जिल्हास्तरावरील नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देवून निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात विविध विकास कामांसाठी रु.३१ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

कोल्हापूर शहरातील रंकाळा तलाव येथे मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डन व जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी रु.४ कोटी ८० लाख, कोल्हापूर शहरात मल्टीपर्पज स्पोटर्स ग्राउंड तयार करण्यास रु.७५ लाख, शहरात विविध ठिकाणी ओपन जिम बसविण्यासाठी रु.१ कोटी, शहरात विचारे माळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी व ग्रंथालयासाठी रु.५० लाख, शहरालगत असणाऱ्या कळंबा तलावाच्या सुशोभिकरण व संवर्धनासाठी रु.४ कोटी ५० लाख, ऐतिहासिक पन्हाळागड येथे लाईट शो, साऊंड शो, लेजर शो व इतर अनुषंगिक कामे यासाठी रु.१२ कोटी, शाहुवाडी पावनखिंड येथे समाधीस्थळांचा विकास, अस्तित्वातील दगडी बांधकामाची डागडुजी, पर्यटकांसाठी प्रसाधनगृह करिता रु.३० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

कागल तालुक्यातील निढोरी गावातील महादेव मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक सुधारणा करण्यासाठी रु.३० लाख, कागल येथील ग्राम दैवत विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरातील रस्ता सुधारणा व पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी रु.१६ लाख, कागल तालुक्यातील पिराचीवाडी महादेव मंदिर व हनुमान मंदिर परिसरात महिला व पुरुष भक्तांसाठी स्वतंत्र भक्त निवास बांधणे रु.१ कोटी ७५ लाख, चंदगड तालुक्यातील देवरवाडीतील श्री वैजनाथ देवस्थान मंदिरासमोर सभामंडप बांधण्यासाठी रु.१ कोटी ९५ लाख, कागल तालूक्यातील सुरपली गावात तलाव परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, रिटेनिंग वॉलचे बांधकाम करणे, स्वागत कमान उभारणे व महादेव मंदिर परिसरात सुशोभिकरण, मंदिर परिसराला जोडणारे रस्ते, राऊंड गटर आणि सांस्कृतिक हॉल बांधण्याकरिता रु.३ कोटी ३० लाख असा एकूण रु.३१ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासास चालना मिळणार

इतक्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी निधी मंजूर झाल्याने आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासास चालना मिळणार आहे. मंजूर झालेल्या निधीबद्दल लवकरच शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेवून किंवा त्यांना कोल्हापूर शहरात आमंत्रित करून करवीरवासीयांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करणार असल्याचीही माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी पत्रकात म्‍हटलं आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news