KDCC Pattern : कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र, शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा केडीसीसी पॅटर्न? | पुढारी

KDCC Pattern : कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र, शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा केडीसीसी पॅटर्न?

कोल्हापूर ; चंद्रशेखर माताडे : जिल्ह्याच्या राजकारणात ‘आमचं ठरलंय’ला तडा गेल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संबंध अधिक घट्ट होत आहेत. केडीसीसी बँकेच्या निवडणुकीनंतर कोल्हापूर उत्तरमधून लढण्याबाबत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेला जिल्ह्यात महाविकास आघाडीपासून दूर ठेवण्याचा केडीसीसी बँक पॅटर्न अधिक ताकदीने पुढे नेण्याच्या हालचाली पडद्यामागे सुरू झाल्या आहेत. भाजप काँगेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत जेथे शक्य आहे तेथे सहभागी होणार की या सत्तेला बाहेरून पाठिंबा देणार, हे त्या त्यावेळी स्पष्ट होईल. सध्यातरी केडीसीसीत काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजप एकत्र आहेत. शिवसेना व भाजपमधील संबंध सध्या तरी ताणले गेले आहेत. (KDCC Pattern)

राज्यात नव्हती तेव्हाही कोल्हापुरात महाविकास आघाडी होती. महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र सत्तेत होते. त्यापूर्वी ताराराणी आघाडीसमवेतही शिवसेना महापालिकेत सत्तेत होती. त्यावेळी ताराराणी आघाडीचे नेतृत्व काँगे्रसचे नेते करत होते. त्यामुळे शिवसेना या ना त्या गटाबरोबर सत्तेत होतीच.

KDCC Pattern : सतेज पाटील व महादेवराव महाडिक यांच्यात संघर्ष

मात्र, सतेज पाटील व महादेवराव महाडिक यांच्यात संघर्ष सुरू झाला. महाडिकांची सत्ता महापालिकेतून उखडण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यामध्ये सतेज पाटील, हसन मुश्रीफ व विनय कोरे यांनी ताकदीने लक्ष घातले व महाडिकांची सत्ता संपुष्टात आणली. अपक्षांच्या जीवावर महापालिकेत सुरू असलेला घोडेबाजार थांबविण्यासाठी सतेज पाटील यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली. पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढल्यामुळे अपोआपच नेत्यांच्या हाती नियंत्रण आले.

पाटील व महाडिक यांच्यातील संघर्ष टोकाला गेला. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून येऊनही धनंजय महाडिक व हसन मुश्रीफ यांच्यातील संबंध ताणलेलेच राहिले. त्यातूनच पुढे सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणत महाडिकांना विरोध सुरू ठेवला. शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्या मागे ताकद उभारली. राष्ट्रवादीतील नाराजी होतीच. ती नेत्यांची होती तशीच ती कार्यकर्त्यांचीही होती. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. शिवसेनेचे संजय मंडलिक निवडून आले.

‘आमचं नवीन ठरलंय’

राजकीय व्यासपीठावर सतेज पाटील, हसन मुश्रीफ व संजय मंडलिक एकत्र वावरू लागले. त्यामुळे जुन्या शिवसैनिकांनी मंडलिक खासदार शिवसेनेचे; पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेतच दिसतात, अशी जाहीर टीका केली.

‘गोकुळ’मध्ये सत्तांतर घडले. महाविकास आघाडीची सत्ता आली; पण खासदार मंडलिक यांच्या मुलाचा व बहिणीचा पराभव झाला. ही सल राहिली. त्यानंतर जिल्हा बँकेत एका जागेवरून महाविकास आघाडी तुटली. शिवसेनेने पॅनेल करून तीन जागा जिंकल्या. शिवसेनेच्या विजय मेळाव्यात बोलताना संजय मंडलिक यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणून गृहित धरू नका, असे ठणकावत आता ‘आमचं नवीन ठरलंय’ असे जाहीर करत ते टोकाला नेण्याचा इशारा दिला.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची विधानसभा पोटनिवडणूक लढविण्यांबाबत शिवसेना आग्रही आहे. काँग्रेस आमदाराच्या निधनाने ही पोटनिवडणूक होत आहे. राज्यात महाविकास आघाडी असली, तरी याला कोल्हापुरात केडीसीसीच्या निवडणुकीत तडा गेला आहे. आता पोटनिवडणूक लढविण्याच्या शिवसेनेच्या आग्रहावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेला लढू द्या, असे सांगून जो काही इशारा द्यायचा आहे, तो दिला आहे.

मात्र, यातून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला सत्तेतून बाजूला ठेवण्याचे ठरविल्याचे दिसते. सध्यातरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहणार व शिवसेनेला बाजूला ठेवणार, अशाच राजकीय हालचाली होत आहेत.

Back to top button