नितेश राणे यांची कोल्हापुरात सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी होणार, मोठा पोलिस फौजफाटा तैनात | पुढारी

नितेश राणे यांची कोल्हापुरात सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी होणार, मोठा पोलिस फौजफाटा तैनात

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी आमदार नितेश राणे आणि राकेश परब यांना अटक केली आहे. आमदार नितेश राणे आणि स्वीय सहाय्यक राकेश परब यांची आज (दि.०५) शनिवारी दुपारी कोल्हापुरात छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालय (सीपीआर) मध्य वैद्यकीय तपासणी होणार आहे. साधारणत: चार वाजता राणे यांना पोलीस बंदोबस्तात येथे आणण्यात येईल असे सांगण्यात आले.

या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयाच्या आवारात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाचारण करण्यात आला आहे. हल्ला प्रकरणी आमदार राणे यांना तीन दिवसापूर्वी अटक झाली होती. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.

आज कणकवली येथील न्यायालयात यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होत आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी राणे यांना कोल्हापुरात आणण्यात येणार आहे.

नितेश राणे यांचे नेमके काय आहे प्रकरण

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्‍लाप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले भाजपचे आ. नितेश राणे यांची गुरुवारी सकाळी 10.30 पासून दुपारी 3.30 पर्यंत कणकवली पोलिस ठाण्यात या गुन्ह्याचे चौकशी अधिकारी तथा कणकवलीचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी त्यांच्या दालनात तब्बल पाच तास कसून चौकशी केली होती. (Nitesh Rane)

पोलिस तपासात पुढे आलेल्या बाबींच्या अनुषंगाने ही चौकशी झाली. त्यानंतर सायंकाळी त्यांना गोव्यात तपासासाठी नेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे यामागे गोवा कनेक्शन आहे का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर पोलिस कोठडीत असलेले आ. नितेश राणे यांचे स्वीयसहाय्यक राकेश परब यांचीही पोलिस ठाण्यात गुरुवारी स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली.

पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने कणकवली न्यायालयासमोर हजर

शुक्रवारी पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने या दोघांनाही कणकवली न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. बुधवारी आ. नितेश राणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुपारी कणकवली न्यायालयासमोर शरण गेले होते. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्‍तिवाद ऐकून घेवून त्यांना दोन दिवसांची म्हणजे 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली होती.

Back to top button